बीड : राजकारणात नेत्याला स्वत:ला काय वाटते यापेक्षाही कार्यकर्त्यांना काय भावते याला महत्व असते. म्हणूनच पंकजा मुंडेंनी ‘मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत हार घालणार नाही तर ओबीसी आरक्षणाचा विषय संपेपर्यंत फेटा घालणार नाही’ ची केलेली घोषणा कार्यकर्त्यांचा ठाव घेणारी ठरली आहे. नेत्यांच्या अशा कांही घोषणा कार्यकर्त्यांना नेहमीच भावत असतात. त्यामुळे आतापर्यंत काहीशा कठोर वाटणार्या पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना भावणार्या म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या ट्रॅकवर चालत असल्याचे चित्र आहे. आणि हेच चित्र जिल्ह्यासह राज्याची सारी राजकीय गणिते बदलायला पुरेसे देखील आहे.
राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांचे वेगळेपण सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या आयुष्यात राजकीय चढउतार येत असतील, आले असतील पण पंकजा मुंडेंना वगळून महाराष्ट्राचे राजकारण होऊ शकत नाही. पंकजा मुंडेंनाही याची पुरती जाणीव आहे. आतापर्यंत राजकारणात पंकजा मुंडेंचा कठोरपणा अनेकांनी अनुभवला. मात्र आता त्याच पंकजांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल टाकत कार्यकर्त्यांना काय भावते हे पाहणे सुरु केले असल्याचे दिसत आहे. गोपीनाथ मुंडे स्टेजवर येताच खिशातून कंगवा काढून तो केसातून फिरवायचे, त्या एका क्षणाची झलक पाहायलाही कार्यकर्ते आतूर असायचे. कार्यकर्त्यांना काय आवडते हे पाहून तसे वागणारा नेता नेहमीच लोकप्रिय होतो. आता पंकजा मुंडेंनी तोच ट्रॅक पकडला आहे. म्हणूनच ओबीसी आणि मराठा या दोन्ही समुहांना सोबत घेवून चालण्याचे राजकारण करताना ‘मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत हार घालणार नाही तर ओबीसी आरक्षणाचा विषय संपेपर्यंत फेटा घालणार नाही’ अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली आहे. पंकजांची ही भूमिका अर्थातच कार्यकर्त्यांना सुखावणारी आहे.
केवळ एका प्रसंगापुरती पंकजांची भूमिका बदलली आहे असेही नाही.
राजकारणात अंगार भंगारच्या घोषणा आवडणारी संस्कृती रुजत असताना गोपीनाथ गडावर कराडांच्या जनआशिर्वाद यात्रेला झेंडा दाखवताना काही कार्यकर्त्यांनी केलेल्या अंगार भंगारच्या घोषणांवर ‘असल्या घोषणा द्यायच्या नाहीत, हा काही लोकांचा कार्यक्रम नाही आणि कोणी अशा घोषणा देणार असेल तर त्याने पुन्हा माझ्याकडे यायचे नाही’ अशी त्या प्रसंगी आवश्यक असणारी आणि नेतृत्वाची उंची दाखविणारी भूमिका देखील पंकजा मुंडेंनी घेतली. यातून त्यांनी त्या सर्वांना सोबत घेवून जाणार्या नेत्या आहेत हेच दाखवून दिले. पंकजांच्या जिल्ह्यात साखर पेरणी करत त्यांचा पाया भुसभूशीत करण्याचा प्रयत्न होतोय हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘ यापूर्वी जे झालं ते झालं, मी सगळं विसरतेय, तुम्ही देखील विसरा. तुम्ही माझ्या हृदयात आहात, इतर कोणाच्या हृदयात जायची तुम्हाला गरज नाही’ अशी साद घालत त्यांनी काहीशा दुरावू पाहत असलेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांनाही पुन्हा आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने अगोदर स्वत:च्या जनाधाराचा पाया पक्का करायचे आणि त्यानंतर सर्वत्र चढाई करायचे अगदी त्याच धरतीवर पंकजा मुंडे आता कार्यकर्त्यांना भावणार्या ट्रॅकवर चालू लागल्या आहेत. हाच ट्रॅक उद्याची राजकीय गणिते बदलवणारा ठरु शकतो.