महसूल आणि पोलिसांची पथके झोपेत
बीड दि.२ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात वाळूच्या अवैध वाहतुकीच्या तक्रारी नेहमी होतात , मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असते. आता मात्र वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने चक्क ग्राम सडक योजनेचे कामच कंत्राटदाराने बंद केल्याचा अहवाल खुद्द कार्यकारी अभियंत्यानीच दिला आहे. यापूर्वी देखील अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्ते खराब झाल्याचा अहवाल कातकरी अभियंत्यांनी दिला होता. आता जर अवैध वाळू वाहतुकीमुळे चक्क रस्त्यांची कामेच थांबणार असतील तर महसूल आणि पोलिसांची पथके काय करीत आहेत हा प्रश्नच आहे.
बीड जिल्ह्यात वाळूच्या अवैध वाहतुकीच्या मोठ्याप्रमाणावर तक्रारी आहेत. रोज अशा तक्रारी येत असल्या तरी महसूल प्रशासन मात्र अशी काही वाळू वाहतूक सुरु असल्याचे मान्य करायला तयार नाही. मात्र आता शासनाच्याच एक विभाग असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनीच गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरु असून त्यामुळे चक्क रस्त्याचे काम बंद पडले असल्याचे म्हटले आहे. तसा अहवालच कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे. गेवराई तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग ११७ ते हिंगणगाव या रस्त्याचे काम कंत्राटदाराने थांबविले असून या मार्गावरून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्याचा दर्जा खराब होत असल्याने हे काम थांबविण्यात आल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे याच कार्यकारी अभियंत्यांनी यापूर्वी देखील प्रशासनाला पात्र देऊन गेवराई आणि बीड तालुक्यातील वाळूच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांवरून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने रस्ते खराब होत आहेत असे या विभागाने म्हटले होते. मात्र अजूनही या विषयात प्रशासनाने कारवाई केलेली नाही.
आयुक्त करणार का कारवाई ?
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाडा विभागात वाळूचा उपसा आणि वाहतूक थांबविण्याचे आदेश दिले होते. तसेच ज्या भागात वाळूची वाहतूक किंवा उपसा आढळूंईं येईल तेथील महसूलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी होती. आता शासनाच्याच एक विभाग असलेल्या अधिकाऱ्यांनीच वाळूच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यामुळे आता आयुक्त कोणावर कारवाई करणार का हा प्रश्न आहे.
वाळूघाटावरच्या सीसीटीव्हीची चोरी
वाळू घाटांवरून होणार अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी वाळूघाटांवर सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यतील अनेक वाळूघाटांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन वाळूघाट २ येथेही असेच सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. मात्र चोरट्यांनी हे सीसीटीव्हीचे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या ठिकाणी नदीपात्रात आणि नदी परिसरात असे तीन कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र ते चोरी गेल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी गेवराईच्या तहसीलदारांना कळविले आहे.
हेही वाचा..
◆ राज्याला दिलासा,बीडसह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम