बीड : कोरोनाच्या निर्बंधांमधून राज्यसरकारने सोमवारी राज्यातील मोठ्या भागाची सुटका केली असून त्या ठिकाणी सायंकाळी ८ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र बीडसह राज्यातील १४ जिल्ह्यांना ही सवलत मिळणार नाही. कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे सांगत या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तराचे म्हणजे सध्या सुरु असलेले निर्बंध कायम राहतील असे शासनाने म्हटले आहे. तसे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
राज्यभरात व्यवसायांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत होती, त्यानुसार राज्य सरकारने सोमवारी ब्रेक द चैन च्या आदेशात बदल केले असून राज्यातील बीडसह १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये व्यवसाय सुरु ठेवण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ८ वाजेपर्यंत , शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तर रविवारी पूर्णतः बंद अशी केली आहे. त्यासोबतच या जिल्ह्यांना इतरही काही सवलती दिल्या आहेत. मात्र बीडसह सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनर आदी १४ जिल्ह्यांना मात्र याचा लाभ होणार नाही. या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगत निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
यात व्यापारी आणि सामान्यांचा काय दोष ?
बीडसह १४ जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाने निर्बंध कायम ठेवले आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंध आवश्यक आहेत असे सरकारचे म्हणणे आहे. यातील काही जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या जास्त आहे हे वास्तव असले तरी जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत नाही म्हणून व्यापारी आणि सामान्यांवर निर्बंध लावणे कितपत योग्य आहे आणि किती दिवस हे निर्बंध लावणार हा प्रश्न आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून बीड जिल्ह्यातच सर्वाधिक निर्बंध आहेत. रुग्ण वाढतात म्हणून जिल्ह्यात अनेकदा लॉकडाऊन करण्यात आला. आताही जिल्ह्यातील चार तालुक्यात अधिक कठोर निर्बंध आहेत. निर्बंधांमुळेच रुग्णसंख्या कमी झाली असती तर इतक्या निर्बंधानंतर देखील जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी कशी होत नाही? यावरही प्रशासनाने विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच रुग्णसंख्या कमी होत नाही म्हणून निर्बंध लादण्यातून व्यापारी आणि सामान्यांचे नुकसान होत असून जगणे अवघड होत आहे. रुग्णसंख्या कमी होत नसेल तर त्यात आमचा काय दोष असा सवाल आता व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा..
◆ ओबीसी आरक्षणाचा मार्ग होणार मोकळा