पुणे-हॉटेल व्यावसायिकांमध्ये असणारी स्पर्धा किती वेगळ्या थराला जाऊन पोहोचली याचा प्रत्यय देणारा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आपल्या हॉटेलचा व्यवसाय चांगला हवा त्यासाठी शेजारच्या हॉटेल मालकाचा खून घडवून प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर गारवा हे प्रसिद्ध हॉटेल आहे. मटन चिकन बिर्याणी खाण्यासाठी याठिकाणी लोक लांबून लांबून येत असतात. या हॉटेलचा दररोजचा गल्ला अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये इतका आहे. परंतु १७ जुलैच्या रात्री हॉटेल मालक रामदास आखाडे रात्रीच्यावेळी हॉटेलच्या बाहेर खुर्चीवर बसले असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर तलवारीने वार करत त्यांचा खून केला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती उजेडात आली.
रामदास आखाडे यांच्या गारवा हॉटेल पासूनच काही अंतरावर आरोपी बाळासाहेब खेडेकर यांचं अशोका हॉटेल आहे. गारवा हॉटेल प्रसिद्ध असल्यामुळे खेडेकर यांच्या अशोका हॉटेलमध्ये ग्राहकांची म्हणावी तशी गर्दी नसायची. परंतु जेव्हा केव्हा गारवा हॉटेल बंद असेल तेव्हा मात्र अशोका हॉटेलचा गल्ला चांगला होत असे. त्यामुळे अशोका हॉटेलचे मालक असलेल्या खेडेकर यांनी अनेकदा गारवा हॉटेलची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. गारवा हॉटेलमध्ये मटणाऐवजी दुसरेच काहीतरी देतात अशा अफवा देखील त्यांनी पसरवल्या. परंतु त्याचा फारसा फरक गारवा हॉटेलवर पडला नाही..
त्यामुळे अशोका हॉटेलचे मालक असलेल्या खेडेकर यांनी गारवा हॉटेलच्या मालकाचा काटा काढला तर हॉटेल बंद पडेल आणि आपल्या हॉटेलला चांगले दिवस येतील असा विचार केला आणि रामदास आखाडे यांचा खून करण्यासाठी त्याने सुपारी दिली. बाळासाहेब खेडेकर याने आपला भाचा सौरभ चौधरी याला त्याने खून केल्यास दररोज दीड ते दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. सौरभ देखील या आमिषाला भुलला आणि त्याने काही सराईत गुन्हेगारांना रामदास आखाडे यांचा खून करण्याची सुपारी दिली.
त्यानुसार 18 जुलै च्या रात्री रामदास आखाडे हे हॉटेलमधील काम आटोपून हॉटेलच्या बाहेर खुर्चीवर निवांत बसले असताना रामा आवताडे याने त्याच्या डोक्यात तलवारीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रामदास आखाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत अशोका हॉटेलच्या मालक, त्याचा मुलगा यांच्यासह अकरा जणांना अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी एका महिलेला देखील अटक केली आहे. खून केल्यानंतर आरोपींनी या महिलेजवळ गुन्ह्यात वापरलेली तलवार दिली होती. ही तलवार या महिलेने आपल्या राहत्या घरात लपवून ठेवली होती. व्यावसायिक स्पर्धेतून उचललेल्या या पाऊलामुळे होटेल अशोकाचे मालक बाळासाहेब खेडेकर आणि त्याच्या मुलाला अखेर तुरुंगात जावं लागलं.