Advertisement

अडीच महिन्यात 34 तासच वीज गेली, मग ‘स्वाराती’ ने 168 तास जनरेटर कशासाठी वापरले ?

प्रजापत्र | Friday, 21/08/2020
बातमी शेअर करा

कोरोनातील नफेखोरी
बीड-अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’ रुग्णालयात असलेल्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेसाठी 52 दिवसांत 168 तास जनरेटर वापरल्याचे देयक स्वाराती प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आल्यानंतर या प्रकारातील धक्कादायक बाबी समोर येत आहेत. स्वाराती रुग्णालयाला एक्स्प्रेस फिडर आहे, त्यामुळे येथील वीजपुरवठा क्वचितच खंडित होतो, या भागातील वीज पुरवठा प्रत्यक्षात कितीकाळ खंडित झाला होता याची माहिती घेतली असता समोर आलेले वास्तव वेगळेच आहे. 4 जून ते 20 ऑगस्ट या अडीच महिन्याच्या काळात स्वाराती परिसरातील वीज पुरवठा केवळ 34 तास खंडित  झाला असल्याची माहिती महावितरणकडून मिळत आहे . मग स्वाराती प्रशासन वीज असताना जनरेटर का वापरत होते हा प्रश्न कायम आहे.


कोरोनाच्या काळात काहीही करा,कोणी पाहणार नाही अशी मानसिकता काही प्रवृत्तीची होत आहे. त्यातून कोरोनाच्या महामारीत नफेखोरीचे प्रकार समोर येत आहेत. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेसाठी जनरेटर वापरण्यात आले. या जनरेटरचे तब्बल साडे सहा लाखांचे देयक तयार करण्यात आले आहे. जनरेटरचे भाडे हा वेगळंच विषय असतानाच 4 जून नंतर 52 दिवसांत 168 तास जनरेटर वापरण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या भागात एक्स्प्रेस फिडर असल्याने येथे वीज पुरवठा सहसा खंडित होत नाही.महावितरणकडून या भागातील विद्युत पुरवठ्याची माहिती घेतली असता 4 जून पासून 20 ऑगस्टपर्यंत केवळ 34 तास वीज पुरवठा खंडित झाल्याची नोंद आहे.मग जर 34 तासच वीज गेली होती तर 168 तास जनरेटर कोठे आणि कशासाठी वापरले गेले हा प्रश्न कायम आहे. मुळात जनरेटरचे भाडे 8 हजार रुपये प्रतिदिन लावले गेले. त्यात जनरेटर वापरल्याचे तास देखील आता वादाच्या भोवर्‍यात आहेत. आणि एका जनरेटरला एका तासाला 13 लिटर डिझेल लागते का हा देखील प्रश्न आहे.कोरोनाच्या नावाखाली सुरु असलेल्या या नफेखोरीला प्रशासन आवर घालणार आहे का ? 

Advertisement

Advertisement