बीड दि.२० (प्रतिनिधी) : अजित कुंभार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाही बीड जिल्हा परिषदेचा मार्च एन्डचं अद्याप संपलेला नसल्याचे समोर आले आहे. सध्या जुलै महिना अर्धा संपला आहे, मात्र अजूनही जिल्हा परिषदेत मार्च एन्डचीच कामे सुरु आहेत. यासंदर्भाने अनेकांची ओरड सुरु असली तरी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला मात्र नियमांचे देणे घेणे नसल्याचे चित्र आहे.
पूर्वी जिल्हा परिषदांचा मार्च एन्ड सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ चालायचा , मार्च संपला तरी अनेक महिने मागच्या महिन्यातील कामे दाखल करून घेतली जायची आणि बिले काढली जायची.बीडीएस पद्धत सुरु झाल्यानंतर याला ब्रेक बसेल असे वाटले होते, मात्र जिल्हा परिषदेत यावरही तोडगे काढण्यात आले आहेत. बीडीएसवरून रक्कम काढून ती जिल्हा परिषदेच्या खात्यात घेतली जाते आणि नंतर मार्च उलटून गेला तरी अनेक दिवस मार्चच्या तारखेत देयके दिली जातात . यावेळी मात्र जिल्हा परिषदेने कहर केला असून जुलै महिना अर्धा संपलेला असतानाही जिल्हा परिषदेत मार्चएंड सुरूच आहे.
नवीन कामांना ब्रेक
जिल्हा परिषदेने मार्च एन्ड क्लोज न केल्याने ज्यांनी चालू आर्थिक वर्षात कामे केली आहेत, त्यातही पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ज्यांनी कामे केली आहेत. त्यांना एप्रिलपासून आपली कामे नोंदविता येत नसल्याचे चित्र आहे. पंचायत समितीच्या पातळीवर जिल्ह्यात सर्वत्रच पदाधिकारी गटविकास अधिकार्यांकडे कामे नोंदवा म्हणून आग्रह करीत आहेत. मात्र जिल्हा परिषदेनेच मार्चचे हिशोब पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळे नवीन नोंदणीच होत नसल्याची परिस्थिती आहे.
बदलून द्यावे लागणार धनादेश
धनादेशाची मुदत तीन महिन्याची असते त्यामुळे ३१ मार्चच्या तारखेत दिलेला धनादेश ३० जून पर्यंत वटविला जाणे शक्य होते. आता अजूनही बीड जिल्हा परिषदेने मार्च एन्ड संपविलेला नाही. वेगवेगळ्या विभागाकडून अजूनही मार्चच्याच तारखेत देयके लेखा विभागात सादर होत आहेत. त्यामुळे आता या देयकावर 31 मार्चच्या तारखेचा धनादेश दिला तरी तो पून्हा नूतनीकरण करुन द्यावा लागणार असून यामध्ये देखील अधिकार्यांची चांदी होणार आहे.