Advertisement

उठसूट निर्बंध म्हणजे 'आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी'

प्रजापत्र | Monday, 19/07/2021
बातमी शेअर करा

  बीड : कोरोनाची महामारी सुरु झाल्यानंतर संपूर्ण जगालाच 'लॉकडाऊन' हा नाव प्रकार समजला. प्रसार रोखायचा असेल तर सारे काही बंद करून लोक घरांमध्येच कोंडाण्याचा हा प्रकार होता. अगदी सुरुवातीच्या काळात कोरोना नवीन होता, कोणत्याच आरोग्य यंत्रणा तितक्या सक्षम नव्हत्या, त्यामुळे सुरुवातीच्या काळात  'लॉकडाऊन' ही अपरिहार्यता होती, मात्र आता कोरोना सुरु होऊन दिड वर्ष होऊ लागल्यानंतरही 'आरोग्य संधीने कमी पडतील ' असे कारण दाखवित पुन्हा 'लॉकडाऊन'हाच प्रशासनाला पर्याय वाटणार असेल तर हा प्रकार सामान्यांच्या नरड्याला बेरोजगारीचा आणि उपासमारीची फास लावण्यासारखे आहे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी धाटणीच्या या वर्तणुकीमुळे कोरोनाचा प्रसार थांबणार तर नाहीच मात्र अर्थव्यवस्थेचे पार वाटोळे होत आहे.

 

 

ज्याज्यावेळी जगात कोठेही एखाद्या नवीन विषाणूचा उद्रेक होतो आणि त्याची संसर्ग क्षमता जास्त असते, आणि त्याला महामारीचे स्वरूप येते , त्यात्यावेळी त्या विषाणूबाबत समाजाची सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी ) हाच खात्रीशीर इलाज असतो असते असे साथरोग शास्त्र सांगते. ही सामूहिक प्रतिकार शक्ती अधिकाधिक लोक बाधित झाले किंवा लसिकरण झाले आणि त्यामाध्यमातून मानवी शरीराला त्या विषाणूची ओळख झाली तर त्यातून निर्माण होते , आणि अशी प्रतिकारशक्ती हाच महामारीवरचा हमखास उतारा असतो, हे झाले शास्त्र किंवा विज्ञान. म्हणूनच जैवेळी कोरोनाची साथ महामारीचे स्वरूप घेऊ लागली होती,त्यावेळी अनेक ठिकाणी हर्ड इम्यूनिटीची चर्चा सुरु झाली होती. मात्र एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक बाधित झाले तर उपचारासाठीची यंत्रणा कमी पडणार होती, बहुतांश देशात आरोग्य व्यवस्थेची क्षमता इतक्या मोठ्याप्रमाणावर लोकांना एकाचवेळी दाखल करून घेण्याची नव्हती, आणि रोग तुलनेने नवीन असल्याने त्याची मारक क्षमता आणि त्यावरील उपचार याबद्दल संभ्रम होता, म्हणून त्यावेळी या रोगाचा प्रसार मर्यादित ठेवणे आवश्यक होते, म्हणून अनेक देशांनी 'लॉकडाऊन' चा पर्याय निवडला. 'लॉकडाऊन' हा उपचार नसला तरी त्यातून आरोग्य संस्था बळकट करायला वेळ मिळेल इतकीच अपेक्षा होती, म्हणजे एका अर्थाने पाहू गेल्यास 'लॉकडाऊन' कोरोनाबाबतीतले 'सवड शास्त्र ' ठरते. पण सवड शास्त्राला कायमस्वरूपी रूप देता येत नसते, किंवा 'सवड शास्त्र' नियम म्हणून वापरता येत नसते. मात्र कोरोनाच्या संदर्भाने 'लॉकडाऊन'चा वापर प्रशासन उपचार म्हणून करू पाहत आहे.

 

मुळात ज्यावेळी एखादी साथ येते त्यावेळी त्यापासून समाजाला वाचवायचे असेल तर ती साथ पसरू द्यावीच लागते, त्याचा आलेख वाढू द्यावाच लागतो, मध्येच हे दाबायचा प्रयत्न केला तर पीक यायला वेळ लागतो आणि ती साथ तितके अधिक दिवस पुढे जात राहते, पीक आल्याशिवाय , मोठ्याप्रमाणावर लोकांमध्ये तो विषाणू पसरल्याशिवाय साथ संपत नाही , असा आजपर्यंतचा स्पॅनिश फ्ल्यू काय किंवा इन्फ्लुएंझा काय याचा अनुभव आहे आणि एपीडिमॉलॉजी अर्थात साथरोगशात्र हेच सांगते. वैद्यकीय अभ्यासक्रमातील  पीएसएम अर्थात प्रतिबंधक सामाजिक वैद्यक शास्त्रात देखील हेच सूत्र सांगितलेले आहे. त्यामुळे अधिकाधिक लोक बाधित झाले तर त्यांच्यावरील उपचारासाठी यंत्रणा उभारणे हाच कोरोनमुक्तीचा मार्ग आहे .

 

मात्र आज कोरोनाची ओळख होऊन दिड वर्ष उलटत आले असले तरी आम्ही 'पुरेशी वैद्यकी संसाधने नाहीत ' म्हणून 'लॉकडाऊन' सारखे उपायच योजित आहोत. मुळात राज्याच्या मुख्यमंत्रांनाच 'लॉकडाऊन' हा कोरोनावरचा रामबाण उपाय वाटतो, प्रशासनाला तेच हवे असते, एकदा का बंद चे आदेश काढले की लोक रस्तयावर येत नाहीत आणि प्रशासनाला प्रश्न देखील विचारीत नाहीत. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले असून लोक कोरोनापेक्षा बेरोजगारी, उपासमार आणि गरिबीने मारायची वेळ सर्वत्र आहे. कोरोना कधी संपणार कोणालाच माहित नाही, त्यावर हार्ड इम्युनिटी हाच मार्ग आहे, त्यासाठी लसीकरण आणि अधिकाधिक समूह संसर्गित होऊ देऊन त्यावर उपचाराची यंत्रणा उभारणे हाच मार्ग आहे, मात्र त्या पातळीवर येत असलेले सरकारी अपयश झाकण्यासाठी सरकार आणि प्रशासन 'लॉकडाऊन'ची ढाल करून सामान्यांच्या अडचणी वाढवीत आहे.
 

 

Advertisement

Advertisement