बीड दि.16 (प्रतिनिधी)ः मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात दुचाकी चोर्यांच्या घटनेत मोठी वाढ झाली होती. विशेष करून माजलगावमधून अनेक मोटार सायकल चोरीला गेल्या होत्या. यासोबत बीड, वडवणी आणि परळीमधूनही दुचाकी चोरांचा सुळसुळाट वाढला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मागच्या चार दिवसात सात दुचाकी चोरांना पकडले असून त्यांच्याकडून 21 मोटार सायकलसह एक बोलेरो गाडीं जप्त केली आहे.
बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या घटनांकडे स्थानिक पोलिसांची सोईस्कर दुर्लक्ष असताना स्थानिक गुन्हा शाखेने मात्र यात लक्ष घातले असून मागच्या चार दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत सात जणांना ताब्यात घेतले आहे. यात चंद्रकांत घोलप रा.चिंचवडगाव याला पकडल्यानंतर पोलिसांना अनेक गाड्यांची माहिती मिळाली. त्यानंतर रणवीर हॉटेल दिंद्रुड येथे काही लोकांनी एका दुचाकी चोराला पकडले होते त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून इतर दुचाकी चोरांची माहिती मिळाली तर परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतही दुचाकी चोरांना पकडण्यात आले. स्थानिक पोलिस आणि गुन्हा शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी सात दुचाकीचोर ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 21 मोटार सायकल जप्त केल्या आहेत तसेच वडवणीतून एक बोलेरो गाडीही जप्त केली.
बातमी शेअर करा