राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जवळपास अर्धा तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीबाबतही खलबतं सुरु आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी पार पडेल? या संदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या चर्चेतील तपशील सध्या गुलदस्त्यातच आहे. या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीत या विषयांवर काही चर्चा झाली का? याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस सातत्याने स्वबळाचा पुनरुच्चार करत आहे. तर पक्षश्रेष्ठीकडून अद्याप ठरलं नसल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इतर दोन पक्षात चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पाच महिने राज्य विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अशा दोन अधिवेशनांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने टाळली. अध्यक्षपद काँग्रेसकडेच कायम राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली असतानाही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अध्यक्षपदाची निवडणूक टाळली जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे.
लोकसभा किंवा विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवता येत नाही का?
लोकसभा किंवा विधानसभेचे अध्यक्षपद हे निरंतर असते. यामुळेच लोकसभा किंवा विधानसभेची मुदत संपली तरी नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत मावळते अध्यक्ष पदावर कायम राहतात. फक्त अध्यक्षांचे निधन अथवा राजीनामा दिला तरच हे पद रिक्त राहाते. अध्यक्षांनी राजीनामा दिला अथवा निधन झाल्यास उपाध्यक्षाकडे या पदाचा कार्यभार सोपविला जातो. राज्यात पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशने पार पडली.
राज्यात अध्यक्षाविना अधिवेशने झाली आहेत का?
राज्यात आतापर्यंत विधानसभेची तीन अधिवेशने अध्यक्षाविना पार पडली. १९७९ डिसेंबरमध्ये तत्कालीन विधानसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तत्कालीन उपाध्यक्ष सूर्यकांत डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्राणलाल व्होरा यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशने अध्यक्षविना पार पडली.
अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत कालमर्यादा आहे का?
लोकसभा अथवा विधानसभा अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपदे ही घटनात्मक पदे असली तरी या पदांच्या निवडणुकांबाबत घटनेत काहीच कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. लोकसभा अध्यक्षपदाकरिता राष्ट्रपती तर विधानसभा अध्यक्षपदाकरिता राज्यपाल मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार तारीख व वेळ निश्चित करतात. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करतात.
राज्यांना कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार आहे का?
हो. प्रत्येक राज्याच्या विधानसभांचे स्वतंत्र नियम असतात. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेचे स्वतंत्र नियम आहेत. उत्तर प्रदेश आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभांमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या पाच वर्षांच्या काळात अध्यक्षपद रिक्त झाल्यास १५ दिवसांत नव्याने निवडणूक घेण्याची तरतूद नियमात आहे. हरयाणात अध्यक्षपद रिक्त झाल्यास पुढील अधिवेशनाच्या पहिल्या सात दिवसांत अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागते. महाराष्ट्र विधानसभा नियमात अध्यक्षांच्या निवडणुकीकरिता कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
राज्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काय आहे?
महाराष्ट्र विधानसभा नियम ६ अन्वये विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेतली जाते. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने होते. अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याकरिता राज्यपाल एक तारीख ठरवून देतात आणि सचिव त्यानुसार निवडणुकीची तयारी करतात. ठरलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी मध्यान्हाच्या पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. विहित मुदतीत एकच अर्ज शिल्लक असल्यास हंगामी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष एकमेव अर्ज असलेला अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करतील. दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज दाखल असल्यास प्रत्यक्ष मतदान घेतले जाईल. मतदानात कोणत्याही उमेदवारास इतर उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांहून अधिक मते मिळाली नसतील तर सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होईल व पुन्हा मतदान घेण्यात येईल. इतर उमेदवारांच्या एकूण मतांपेक्षा पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला जास्त मते मिळत नाहीत तोपर्यंत मतदान घेण्यात येईल. समान मते मिळाल्यास अध्यक्षस्थान भूषविणाऱ्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. गुप्त मतदान पद्धतीऐवजी विश्वासदर्शक ठरावाच्या धर्तीवर आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेता येईल का, याची चाचपणी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
अध्यक्षपदासाठी कधी निवडणूक झाली?
अलीकडच्या काळात अरुण गुजराथी वगळता बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसे-पाटील, हरिभाऊ बागडे आणि नाना पटोले हे बिनविरोधच अध्यक्षपदी निवडून आले होते. १९९९ मध्ये अध्यक्षपदासाठी अरुण गुजराथी विरुद्ध गिरीश बापट अशी लढत झाली होती. तेव्हा गुजराथी यांना १५४ तर बापट यांना १३२ मते मिळाली होती.