Advertisement

 राजकारणाचा धर्म

प्रजापत्र | Wednesday, 14/07/2021
बातमी शेअर करा

 

 

 भाजपच्या राष्ट्रीय सचिव  तथा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी अखेर आपल्या नाराज कार्यकर्त्यांना आवरले आहे. डॉ. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ न शकल्याने नाराज मुंडे समर्थकांनी राजीनामे देणे सुरु केले होते, त्यामुळे पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील का या चर्चांना देखील उधाण आले होते. अर्थात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पंकजा मुंडेच  काय, भाजपच्या कोणत्याच नेत्याने 'वेगळा' निर्णय घ्यावा अशी परिस्थिती नाही. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे पंकजांनी सबुरीचा भूमिका घेतली ते एका अर्थाने त्यांच्या राजकारणासाठी बरेच झाले असेच म्हणावे लागेल. कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी भलेही 'पंतप्रधानांनी आपल्याला चांगली वागणूक दिली ' असे सांगितले असेल मात्र , 'संयम ठेवा, नाही तर राजकारण संपेल ' असे जे सूचक विधान मोदींनी केल्याचे सांगितले जाते , तो इशारा पंकजा मुंडे सहज समजू शकतात .
पंकजा मुंडेंनी सध्या तरी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला असला आणि कोणताच निर्णय घेण्याची ही वेळ नसल्याचे सांगितले असले, 'जेव्हा छत अंगावरच पडेल तेव्हा पाहू ' असे त्या म्हणाल्या असल्या तरी त्यांच्या मूळ स्वभावाला त्या आवर घालू शकत नाहीत, त्यातूनच त्यांनी 'धर्मयुद्ध टाळण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न करील ' असे विधान करून राज्य भाजपातील अस्वस्थता अजूनही मिळतली नसल्याचेच स्पष्ट केले आहे. राजकारणात कोणतेच युद्ध हे धर्मयुद्ध नसते, सारे काही सत्ताकारण असते, आणि येथे कोणी कौरव किंवा पांडव असेही नसते. त्याही पुढे जाऊन कौरव काय किंवा पांडव काय, त्यांचे कुळ शेवटी एकच होते, आणि ते जे लढले ते देखील सत्तेसाठीच, त्यात व्यापक जनहित नावाचा प्रकार काहीच नव्हता .

 

 

त्यामुळे आता पंकजा मुंडे राज्यात स्वकियांशी लढाई टाळण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते चांगलेच आहे. शेवटी युद्धात बळी जातो तो सामान्यांचा. येथे देखील मुंडे -फडणवीस वादात भरडले जाणार ते कार्यकर्ते . त्यामुळे पंकजा युद्ध टाळण्यासाठी पुढाकार घेणार असतील तर ते बरेच आहे, पण हे टाळण्यासाठी शिष्टाई करायची कोणी ? महाभारताच्या युद्धात कृष्णाने  शिष्टाई    करून देखील युद्ध टळले नव्हते. कारण दोन्ही बाजूंना सत्तेची अभिलाषा होती. आता तर पंकजांच्या बाजूने बोलायचे कोणी हाच मोठा प्रश्न आहे, आजघडीला, राज्याचे भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडेच आहे, आणि ते त्यांच्याकडेच राहील हे स्पष्ट आहे, त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेतल्याशिवाय आज तरी पंकजा मुंडे गटाला पर्याय नाही. राजकारणात संयम ठेवा   असे जे मोदींनी सांगितले आहे तो धडा जरी पंकजांनी व्यवस्थित गिरविला तर सत्तेच्या सारीपाटाच चित्र कदाचित वेगळे असेल. मात्र त्यासाठी पंकजांना अगोदर स्वतःची शक्ती वाढवावी लागेल.

 

 

पंकजांनी मागच्या काही वर्षात जनतेशी नाळ तुटल्यात जमा आहे. मोजके कार्यकर्ते म्हणजे सामान्य जनता नव्हे. सामान्य जनतेच्या प्रश्नावर पंकजा आक्रमक झाल्या आहेत हे मागच्या काही वर्षात पाहायला मिळाले नाही. या महाराष्ट्राने पितृ निधनाचे दुःख ताजे असतानाही राज्यभर संघर्ष यात्रा काढणाऱ्या पंकजा मुंडे पहिल्या होत्या आणि त्यांच्यावर तितकेच प्रेम देखील केले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पंकजा मुंडेंची भरपावसात झालेली गर्दी राज्याने पहिली आहे, मात्र तो सारा इतिहास झाला असे म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे. पंकजा मुंडे सामान्यांच्या प्रश्नांवर भांडण्यापेक्षा कधी गडाच्या विषयात तर कधी आणखी कोणत्या बाबतीत आक्रमक होतात, मात्र कोरोनाच्या काळात ऊसतोड कामगारांचे हाल होत असताना त्या आक्रमक होत नाहीत, त्यांच्याच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत असताना, गुन्हेगारी वाढलेली असताना त्या बोलत नाहीत, हे चित्र त्यांच्या राजकारणासाठी बरे नाही. गोपीनाथ मुंडे सत्तेपासून दूर असतानाही त्यांची शक्ती असणाऱ्या जनतेपासून दूर नव्हते. पंकजा मुंडेंच्या बाबतीत मात्र चित्र तसे नाही. त्यांना जनतेत जावे लागणार आहे. अगोदर लोक त्यांच्याकडे यायचे त्यावेळी त्यांना गर्दी नको असायची, मात्र ही गर्दीच राजकीय व्यक्तीची शक्ती असते, आणि ज्यावेळी ज्याच्याकडे शक्ती असते त्याच्याच युद्ध टाळण्याच्या भाषेला किंमत असते. संयम आणि शक्ती हाच राजकारणात महत्वाचा धर्म असतो. पंकजांनी इतके तरी समजून घ्यावे. 
 

Advertisement

Advertisement