Advertisement

वेळ चुकीची

प्रजापत्र | Tuesday, 13/07/2021
बातमी शेअर करा

 

 

 केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्र भाजपातील अस्वस्थता वाढीस लागली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात मोदींनी ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणूका आहेत त्या राज्यांवर अधिक भर दिला आहे हे स्पष्टच आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातून काही चेहर्‍यांना या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली, त्यावेळी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ.प्रितम मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश होईल असे वाटत होते पण ऐन वेळी डॉ.प्रितम मुंडेंना डावलण्यात आले. मुळात मागच्या काही वर्षात भाजपने सातत्याने मुंडे कुटुंबालाच काहीसे बाजूला टाकण्याचा निर्णय घेतला असावा अशी परिस्थिती आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत नव्याने कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही मात्र आजच्या भाजपचा चेहरा मोहराच पुर्णत: बदललेला  आहे. त्यातही ज्या मोदींचे मुंडे महाजनांशी कधी पटले नव्हते ते मोदी आता भाजपचे सर्वेसर्वा आहेत त्यामुळेच महाराष्ट्रात मुंडे समर्थकांऐवजी देवेंद्र फडणवीसांच्या हाती पक्षाची सारी सुत्रे दिली गेली. अगदी गोपीनाथ मुंडेंच्या हयातीतच हा प्रकार सुरू झाला होता. त्यामुळे आजचे हे मोदींचे वागणे मुंडे समर्थकांना वाईट वाटणारे असले तरी ते अनपेक्षित नक्कीच नाही.

 

गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वारसदारांना भाजपने न्याय द्यावा असे कोणालाही वाटण्यात काहीच गैर नाही मात्र त्याचवेळी पंकजा मुंडेंनीही आपले कोठे चुकतेय याचा विचार करणे आवश्यक आहे. गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा निभावायचा तर गोपीनाथ मुंडेंचे सर्वच गुण अंगिकारणे अपेक्षित असते. ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो’ हे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाचे सूत्र होते आणि सामान्य माणसांसोबत जोडलेली नाळ, अलोट प्रेम करणारी सामान्य जनता ही गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाची शक्ती होती त्यामुळेच गोपीनाथ मुंडे भलेही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अगदी मोजका काळ सत्तेत राहिले पण त्यांचे संबंध सत्तेपलिकडचे होते. गोपीनाथ मुंडे सत्तेत नसतांनाही त्यांची कामे कधी अडली नाहीत कारण सत्तेच्या काळात आणि एकंदरच राजकीय जीवनात गोपीनाथ मुंडेंनी अनेकांना ताकद दिली. पुढे तिच माणसे गोपीनाथ मुंडेंसाठी काहीही करायला तयार असायची. गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा आम्ही निभावत आहोत म्हणणारांनी आपल्या सत्तेच्या काळात अशी किती लोकांना ताकद दिली हे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे. गोपीनाथ मुंडेंचे संबंध पक्षापलिकडचे होते. इथे पक्षातही सर्वांसोबत संबंध तयार करण्यात पंकजा मुंडे कमी पडत आलेल्या आहेत हे कोणी नाकारणार नाही.

 

 

 

पंकजा मुंडेंना राजकारणात उत्तरोत्तर यश मिळायला हवे, बीड जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर या जिल्ह्यातील व्यक्ती राज्याच्या राजकारणात सक्रीय असणे जिल्ह्यासाठी देखील महत्त्वाचे असते, राज्यासाठीही महत्त्वाचे असते. मात्र ज्यावेळी पंकजा मुंडे स्वत:ला राज्याच्या नेत्या म्हणवितात त्यावेळी पंकजा मुंडेंवरील अन्यायाचा जो सल  आहे त्याच्या वेदना राज्याच्या सर्व भागात जाणवायला हव्या होत्या. गोपीनाथ मुंडेंबद्दल ज्यावेळी पक्षाकडून अन्याय केल जात होता त्यावेळी सार्‍या राज्यातून लोक गोपीनाथ मुंडेंसाठी पक्षाचा विरोध करायलाही समोर आले होते हे नाते निर्माण करावे लागते ते आपोआप होत नाही. याची जाणीव पंकजा मुंडेंनी ठेवणे आवश्यक आहे.

 

राहिला प्रश्‍न प्रितम मुंडेंना डावलण्याचा आणि त्यानंतरच्या कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्राचा, तर राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. बंडाचा असेल किंवा समर्थनाचा निर्णय योग्यवेळी घ्यावा लागतो. राजकारणात योग्यवेळी योग्य भुमिका घेता आली नाही तर परिणाम उलटे होतात. आजच्या तारखेला महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास राज्यात कोणत्याच निवडणूका तोंडावर नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या कितीही कलगीतुरा सुरू असला तरी सरकारचा बळी देवून थेट निवडणूकीला सामोरे जाण्याची इच्छा या तिन्ही पक्षाची नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजच फार काहीतरी वेगळे घडेल असे नाही. अशावेळी पंकजा मुंडेंची पक्षाला तातडीने गरज पडावी किंवा पंकजांमुळे आजच मोठा फटका बसेल अशी परिस्थिती भाजपच्या दृष्टीने नाही. पंकजांची नाराजी निवडणूकीच्या तोंडावर आली असती तर पक्षाला याचा गांभिर्याने विचार करावा लागला असता मात्र नाराजी व्यक्त करण्याची किंवा घरातच बसण्याची ही वेळ नक्कीच नाही.
 

Advertisement

Advertisement