अंबाजोगाई-औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत आले होते.आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली.या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.मात्र आंदोलक अजूनही पोलीस उपअधीक्षक जायभाये यांच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम आहेत.जो पर्यंत निलंबन होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड.माधव जाधव यांनी जाहीर केली आहे.
गेल्या चार दिवसांपासुन सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना,जिल्हा पोलिस अधीक्षक आर.राजा शुक्रवारी सायंकाळी अंबाजोगाईत आले होते.त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.मात्र,आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने आता मागील चार दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन पुढेही सुरूच राहणार आहे.अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात सर्वत्र आंदोलनाचे लोण पसरले आहे.लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाचा भडका उडेल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड.माधव जाधव यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण :-विनयभंग आणि ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले डॉ.सुहास यादव हे फरार आहेत.डॉ.यादव यांचा शोध घेताना चौकशी करण्यासाठी म्हणून स्वतः डीवायएसपी सुनील जायभाये यांनी मंगळवारी (०६ जुलै) रात्री त्यांचे चुलत भाऊ विलास यादव यांना प्रशांतनगर भागात गाठले.तिथे जायभाये यांनी विलास यादव यांना अर्वाच्च भाषेत जातीवरून शिवीगाळ करत मारहाण केली,कुटुंबाबाबतही आक्षेपार्ह्य भाषा वापरली असे क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.त्यानंतर यादव यांना पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली.मराठा क्रांती मोर्चाचा काही कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर यादव यांची सुटका करण्यात आली.या घटनेचे पडसाद बुधवार पासून उमटण्यास सुरूवात झाली.विलास यादव यांना चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण व जातीवाचक अर्वाच्च शिवीगाळ करणारे डीवायएसपी जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.ते सलग चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारीही सुरूच होते.
आंदोलनाला यांचा पाठिंबा
या आंदोलनास आ.सुरेश धस,आ.संजय दौंड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे,काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबाजोगाई साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर,पृथ्वीराज साठे,महादेव सूर्यवंशी, डॉ.नरेंद्र काळे,सुरज पटाईत,अच्युत गंगणे,उद्धवराव आपेगावकर,प्रा.नानासाहेब गाठाळ,अशोकराव देशमुख,कालिदास आपेट,गजानन मुडेगावकर आदींचा पाठिंबा आहे.
राडीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन :-अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक आणि त्यांच्या सहका-यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तीचा निषेध करीत राडी येथे मराठा समाज बांधवांनी वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.