बीड - एका दुचाकी चोरीचा उलगडा केल्यानंतर दिंद्रुड पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. नितीन वसंत मुंडे ( रा.पहाडी दहिफळ ता.धारूर ) व गणेश काशिनाथ गायकवाड ( रा.पार्थी जि.परभणी ) अशी अटकेतील आरोपींची नवे आहेत.
गेल्या कांही दिवसांपासून दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तेलगाव येथील एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या घटनेची दिंद्रुड पोलीसांनी गंभीरतेने दखल घेत तपास सुरु केला. पोलिसांनी काही तासांमध्ये दुचाकीसह गणेश काशिनाथ गायकवाड या चोरास अटक केली. चौकशीनंतर त्याने दुचाकी चोरीत आणखी काही साथीदार असल्याचे सांगितले.
यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, डीवायएसपी जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रभा पुंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत चोरीच्या तब्बल दहा दुचाकी जप्त केल्या. तसेच पोलिसांनी वडवणी येथून अन्य एक आरोपी नितीन वसंत मुंडे यास शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतले. ही कारवाई सपोनि प्रभा पुंडगे, पीएसआय विठ्ठल शिंदे, अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड, सरवदे, संजय मुंडे आदी कर्मचाऱ्यांनी केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून इतर दुचाकी चोरींचा उलगडा यातून होण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरु आहे. यातून परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येतील. तसेच दुचाकी चोरांची मोठी टोळी असण्याची शक्यता असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
- प्रभा पुंडगे, सपोनि