बीड - (प्रतिनिधी) ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर पडून आई आणि मुलगा भाजल्याची घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेशनगर भागात शुक्रवारी ( दि. २ ) पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत महिला किरकोळ तर मुलगा गंभीररित्या भाजला होता. दरम्यान, सोमवारी ( दि. ५ ) रात्री उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. तर महिलेस उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.
गोरख गिज्ञानदेव काराडे वय ( ३७ ) व सत्यभामाबाई गिज्ञानदेव काराडें वय ( ७५ ) आई व मुलगा दोघे ( रा. कंळसंबर जि. बीड ) कामासाठी तळणेवाडी येथे आले होते. गोरख नाशिक येथे मिस्त्री काम करत असे. लॉकडाऊनपासून तो काम नसल्याने घरीच होता. मिस्त्री काम करण्यासाठी तो तळणेवाडी येथे आला होता. दोघेही तळणेवाडी येथील जावई विठ्ठल लक्ष्मण शेंडगे यांच्या घरी राहत. शुक्रवारी ( दि. २ ) रात्री जेवण करून दोघे एका खोलीत झोपले. दरम्यान, सकाळी ओघंळीसाठी गरम पाणी करण्यासाठी ड्रममधील पाण्यात हिटर लावले होते. मात्र, बराच वेळ हिटर चालूच राहिल्याने ड्रम फुटला. त्यातील उकळते पाणी झोपेत असलेल्या मायलेकराच्या अंगावर पडले. यात आई किरकोळ तर मुलगा गंभीररीत्या भाजला गेला. महिलेवर बीड येथे उपचार करण्यात आले. गंभीर भाजलेल्या मुलावर औरंगाबाद येथे अधिक उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी ( दि. ५ ) रात्री मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी,एक मुलगी असा परिवार आहे.