Advertisement

समाजाला फसवू नका, समोर येऊ द्या निकालातील सत्य

प्रजापत्र | Saturday, 03/07/2021
बातमी शेअर करा

बीड : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत हे स्पष्ट आहे. तरीही काही लोकप्रतिनिधी तसे अधिकार असल्याचे सांगत आहेत, मात्र अशाप्रकारे समाजाला फसवू नका, निकालातील सत्य समोर येऊ द्या या शब्दात खा. संभाजीराजे यांनी भाजपचे नाव न घेता या पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. खा. संभाजीराजे खोटे बोलत आहेत असे एकदा फडणवीसांनी सांगावेच असेही ते म्हणाले. बीड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

मराठा आरक्षण प्रश्नावरील राज्यव्यापी जनसंवाद दौऱ्यादरम्यान खा. संभाजीराजे बीड येथे आले होते. शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षण आणि सवलती या विषयात केंद्र आणि राज्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. राज्य सवलतींच्या विषयात काम करीत आहे, त्यामुळे आपण राज्य सरकारला वेळ दिला आहे. मात्र आता केंद्राने वटहुकूम आणि घटनादुरुस्ती केल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही असे ते म्हणाले. 
भाजपचे लोकप्रतिनिधी अजूनही राज्याला अधिकार आहेत असे म्हणत असल्याचे विचारल्यावर 'समाजाला फसवू नका, निकालातील सत्य समोर येऊ द्या. मला कोणत्या पक्षाबद्दल बोलायचे नाही, मात्र एकदा खा. संभाजीराजे खोटे बोलत आहेत का, किंवा त्यांची भूमिका चुकीची आहे का असा प्रश्न फडणवीसांनाच विचारा '  असेही खा. संभाजीराजे म्हणाले. 
-

 

ओबीसींसोबत कायम 
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महारांजाचे आपण वारसदार आहोत. आपण सामाजिक दुरी कमी करण्यासाठी राज्यात फिरत आहोत. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील आपला पाठिंबा असून ओबीसींसोबत आपण कायम आहोत असेही खा. संभाजीराजे म्हणाले. 

Advertisement

Advertisement