बीड-जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवाचे काय होणार या संदर्भातील उत्सुकता आता संपली आहे. कोरोना काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशाची स्थापना करता येणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येत येणार नाही. तसेच गणपतीच्या आगमनाची किंवा विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. 5 व्यक्तींमध्ये काय तो उत्सव करा असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळांना दिले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 22 ऑगस्ट पासून होत आहे. मात्र राज्यात कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू आहेत. त्याचा फटका यावेळी गणेशोत्सवाला बसणार आहे. गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. यात ज्यांना सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्याची आहे त्यांना ती करता येईल मात्र त्यासाठी 5 पेक्षा अधिक व्यक्ती जमविता येणार नाहीत. आरतीला देखील एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाहीत याची काळजी मंडळाला घ्यावी लागेल असेही जिल्हाधिकार्यांनी गणेश मंडळ पदाधिकार्यांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
विसर्जन मिरवणूक नाही
गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक देखील यावर्षी असणार नाही. घरात अथवा मंडळाच्या ठिकाणी पूजा करून केवळ 5 व्यक्तींनी मूर्तीचे विसर्जन करावे असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. शक्य असेल तर यावर्षी मूर्तीचे विसर्जन करू नये असेही जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे.
मूर्तीला 4 फुटाची मर्यादा
गणेशोत्सवात मोठमोठ्या मूर्ती स्थापित केल्या जातात , पण यावर्षी मूर्ती 4 फुटापेक्षा मोठी असणार नाही असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.