Advertisement

खिडकीतून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 28/06/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-तालुक्यातील साकूड येथील एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता.यावेळी त्याची प्रकृती गंभीर असल्याने अंबाजोगाईच्या  स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सोमवारी (दि.२८) त्या रुग्णाने हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारत आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

 

           

 प्रकाश उत्तम राठोड (वय ३६, रा. साकूड, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून प्रकाशने शनिवारी (२६ जून) विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याच्यावर पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. परंतु, सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास प्रकाशने बांधलेले हात कसेबसे मोकळे केले आणि हाताचे सलाईन काढून टाकून अतिदक्षता विभागाच्या बाहेर आले. त्यानंतर समोरच असलेल्या डायलीसीस विभागातील शौचालयात तो गेला. शौचालयाच्या खिडकीचे गज काढून त्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाली उडी मारली. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपस्थितांनी त्याला तातडीने अपघात विभागात दाखल केले असता तिथे उपचारा दरम्यान पहाटे ३ वाजता प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाशच्या पत्नीच्या जबाबावरून अंबाजोगाई शहर  ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
 

Advertisement

Advertisement