बीड-मराठा आरक्षणाचा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा, ऊसतोड कामगारांच्या सामाजिक सुरक्षेचा कायदा करावा, कंत्राटी कोरोना कर्मचाऱ्यांना थेट सेवेत घ्यावे यासह इतर मागण्यांचा आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वातील आ. सुरेश धसांचा मोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आ.सुरेश धस यांनी राज्य सरकार वर कठोर शब्दात टिका केली.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचे सांगत भाजप आ. सुरेश धस यांनी मोर्चाची हाक दिली होती. याला जिल्हाभरातून मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आ.धस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आ.लक्ष्मण पवार,प्रकाश कवठेकर, माऊली जरांगे, शिवाजी पवार, गंगाधर काळकुटे, सचिन उबाळे, भारत जगताप,अशोक तावरे,संभाजी सुर्वे आदी सहभागी झाले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून कारंजा मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मराठयांना आरक्षण मिळाले पाहिजे यासह अनेक घोषणांनी यावेळी बीड शहर दणाणून गेले होते. कारंजा भागात मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर सुभाष रोडवर एमआयएमच्या वतीने शेख शफिक यांनी मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.