बीड दि.२४ (प्रतिनिधी)-बीड शहरातून वाहणारे बिंदुसरा नदी बीडची जीवनवाहिनी असली तरी मागच्या काही वर्षात या नदीत नैसर्गिक आणि मानवी अतिक्रमणे वाढली आहेत. नदीत मोठ्याप्रमाणावर बाभळबन वाढलेले असतानाच बीड शहरातील कचरा देखील नदीपात्रातच टाकला जात आहे, तसेच अनेक ठिकाणी या नदीत चक्क डफगडगोटे , सिमेंटचे ठोकले टाकून भराव घातला जात आहे. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा येत असून नदीचा प्रवाह तुंबला तर उद्या याचा मोठा धोका बीड शहराला होणार आहे.
बीड शहरातून वाहणारे बिंदुसरा नदी शहराची नव्हे तर तालुक्याची जीवनवाहिनी आहे. मात्र सध्या या नदीला अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. या नदीत एकतर ठिकठिकाणी बाभळबन वाढले आहे, नदीची स्वच्छता झालेली नाही, त्यामुळे नदीच्या प्रवाहाला मोठ्याप्रमाणावर अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच सध्या नदीच्या पात्रात ठिकठिकाणी शहरातील कचरा आणून टाकण्यात येत आहे. तसेच नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी भराव घालण्यात आला असून त्याठिकाणी नदी पात्राला मैदानाचे स्वरूप देण्यात आले आहे. काही ठिकाणी नदीच्या कडेला भराव घालून नदी पात्रात अतिक्रमण करून प्लॉटिंग देखील टाकण्यात आली आहे. यासाऱ्यामुळे नदीच्या मूळ प्रवाहातच अडथळे येत आहेत. उद्या जर मोठा पाऊस आला आणि नदीचा प्रवाह अडला तर सारे पाणी बीड शहरात घुसल्याशिवाय राहणार नाही.
अतिवृष्टीचा अंदाज असल्याने भीती वाढली
यावर्षी महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच सध्या देखील सिंचन प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. बिंदुसरा धरणातील पाणीसाठा देखील सध्या अर्ध्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे यावर्षी बिंदुसरा धरण लवकर भरेल असा अंदाज आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे जास्त पाऊस झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली तर बीड शहराचे चित्र भयावह असेल. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
आठवणी अजूनही ताज्या
बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीने आपले विनाशक रौद्र रूप १९८९ मध्ये दाखविले होते. त्यावेळी आलेल्या महापुरात बीड शहराचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते . अगदी विजेच्या तारांना , झाडांना प्रेते लटकली होती. त्यावेळी तरी नदीचे पात्र विस्तीर्ण होते , आता तर भूमाफियांच्या आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने हे पात्र देखील कमी झाले आहे. १९८९ च्या आठवणी आजही बीडकरांच्या जुन्या पिढीच्या अंगावर काटा आणतात,त्यामुळे पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशीच अपेक्षा सामान्यांना आहे.