Advertisement

  तपासण्यात अव्वल असल्याने वाढतेय रुग्ण संख्या                            

प्रजापत्र | Tuesday, 22/06/2021
बातमी शेअर करा

 

 बीड दि.२१ (प्रतिनिधी)-राज्यात कोरोनाचा आलेख खालावला असला तरी अजूनही बीड जिल्हा कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीमध्ये जास्तच आहे. अनलॉकच्या निकषात तिसऱ्या लेव्हलमध्ये असलेल्या बीड जिल्ह्याती मृत्यूंची आणि रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी असली तरी कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्यात बीड जिल्हा मराठवाड्यात अव्वल असल्यानेच बीड जिल्ह्यात रुग्ण देखील जास्त सापडत असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्याचे १० लाख लोकसंख्येमागे असलेले तपासणीचे प्रमाण मराठवाड्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ६ लाख तपासण्या झाल्या असून त्यातील पॉझिटिव्ह  रुग्णांचा आकडा ९२ हजारांच्या घरात आहे.

 

          मराठवाड्याच्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर अजूनही ५ % च्या आत आलेला नाही, तसेच बीड जिल्ह्याचा मृत्युदर देखील वाढलेला दिसत असल्याने राज्य स्तरावर याची चर्चा होत आहे. यामुळे जिल्ह्यात काहीसे भीतीचे चित्र आहे. मात्र जिल्ह्यातील रुग्णांचा वाढता आकडा हा वाढत्या तपासण्यांमुळे असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ९० हजारांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत, जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केल्यास सुमारे २४ % लोकसंख्येच्या चाचण्या झाल्या आहेत. हे प्रमाण मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासण्या होत असल्याने आणि ग्रामीण भागात देखील तपासण्या अधिक होऊ लागल्याने रुग्ण समोर येत आहेत. मात्र असे असले तरी जिल्ह्याच्या प्रत्येक दहा लाख लोकसंख्येत बाधित रुग्ण निघण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत खूप कमी आहे. जास्तीत जास्त तपासण्या होऊन रुग्ण समोर येत असल्याने बीड जिल्हा भविष्यात लवकर सुरक्षित व्हायला मदत होणार आहे.

 
तुलनात्मक आकडेवारी
घटक                                                    बीड                  राज्य
१० लाख लोकसंख्येमागे चाचण्या            २१८५५८            २, ३८, ७१५
१० लाख लोकसंख्येत बाधित                    २८२३४              ४८१२७
एकत्रित पॉझिटिव्हिटी                            १४. ८४ %            १६ %
मृत्यू दर                                              २. ६७ %             १. ९७ %
बाधितांचे प्रमाण                               राज्याच्या दीड टक्के   देशाच्या २२ टक्के

 
  

 

Advertisement

Advertisement