कोरोनावरील उपचारासाठी शासनाने जाहीर केले खाजगी रुग्णालयाचे दर;भरारी पथके करणार तपासणी
बीड-जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 7 खाजगी रुग्णालयांना कोरोनावरील उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र या खाजगी रुग्णालयांना कोरोनाग्रस्त रुग्णांना मनमानी दर आकारणी करता येणार नाही. कोरोनावरील उपचारासाठी जनरल वॉर्डात 4 हजार रुपये , आयसीयूला साडेसात हजार तर व्हेंटिलेटर ला 9 हजार रुपये रोज इतकाच दर खाजगी रुग्णालये घेऊ शकणार आहेत. या रुग्णालयांनी रुग्णांना किती दर आकारले याची तपासणी भरारी पथकांमार्फत होणार आहे. या रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारणी करू नये असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. उपचारासोबतच रुग्णवाहिकांनी देखील अधिकचे दर आकारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यात आता खाजगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोनावरील उपचार होऊ शकणार आहेत. जिल्ह्यातील 7 रुग्णालयांना अशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र या परवानगीचा गैरवापर करित खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी करू नये यासाठी आता जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची स्थापना केली आहे. ही भरारी पथके संबंधित रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना रुग्णांवरील उपचाराची देयके पाहणार आहेत . यात शासनाने ठरवून दिलेल्या दरांचे उल्लंघन झाल्यास रुग्णालयावर कारवाई होणार आहे. रुग्णालयांसोबतच रुग्णवाहिकांनीदेखील रुग्णांकडून अधिकचे दर आकारू नयेत असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
या खाजगी रुग्णालयांमध्ये होणार उपचार
बीड जिल्ह्यातील लोटस (बीड आणि कराड (परळी )या रुग्णालयांना कोरोनावरील उपचार करण्यास परवानगी देण्यात आली होती, आता यात आणखी 5 रुग्णालयांची भर पडली आहे. यात पॅराडाईज, स्पंदन (बीड), यशवंत (माजलगाव) मुंडे चिल्ड्रेन्स हॉस्पिटल (परळी) आणि घुगे हॉस्पिटल (अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.
जीव वाचविणारी औषधे आणि तपासण्यांसाठी मात्र वेगळे शुल्क
राज्य सरकारने हे दर ठरवून दिले असले तरी यात पीपीई किट , सेंट्रल लाईन सारख्या सेवा, कोव्हीड तपासणी, सिटीस्कॅन, एमआरआय,पेट स्कॅन, किंवा एबीजी सारख्या तपासण्याचा समावेश नाही, यासाठी रुग्णांना वेगळे शुल्क द्यावे लागेल. तसेच हायएंड ड्रग म्हणून ओळखल्या जाणार्या इम्युनोग्लोबीन, मेरोपेनम , रेमिडिसेव्हीर, टॉसिलीझूमब,पॅरेंटल न्यूट्रिशन आदींसाठी वेगळे शुल्क भरावे लागणार आहे.
रुग्णवाहिकांना काय आहे बंधन?
राज्य शासनाने सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांचा दर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार रुग्णवाहिकांना प्रतिकिलोमीटर 15 रुपये आणि प्रवास 8 तासांपेक्षा अधिकचा असेल तर प्रति तास 75 रुपये प्रतिक्षा शुल्क आकारता येते . खाजगी रुग्णवाहिकांनी देखील अशीच आकारणी करणे अपेक्षित आहे.