बीड-बीडच्या 'आदित्य' महाविद्यालयात सुरु असलेल्या स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांची रवानगी आता आदित्यमधील स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडील जिल्हा रुग्णालयातील जबाबदारी डॉ. आय. व्ही. शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
बीडच्या आदित्य महाविद्यालयात असलेल्या स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. सुरेश साबळे यांनी स्वतः दोन वेळा आदित्यमध्ये भेट देऊन याची खातरजमा केली होती. सोमवारी तर डॉ. साबळे स्वतः ओपीडीमधील रुग्ण तपासण्यासाठी थांबले होते. एकीकडे अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भाने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्याबद्दल देखील तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता 'आदित्य'मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी म्हणून डॉ. सुखदेव राठोड यांची रवानगी आदित्यमधील स्थलांतरित रुग्णालयात करण्यात आली आहे. तसे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी दिली. डॉ. राठोड यांची आदित्यमध्ये पाठवणी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्याकडील जबाबदारी डॉ. आय. व्ही . शिंदे पाहणार आहेत.