अशोक शिंदे
नेकनूर - दि. ११ नेकनूरच्या दक्षिणेस असलेल्या आठ किलोमीटरवरील कळसंबर येथील उसाच्या शेतात वाघ असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आल्याने अनेकांनी गर्दी केली होती नंतर पोलिसासह वन विभागाची टीम पाचारण केल्या नंतर तो बिबट्या असल्याचे उघड झाले. सदरील बिबट्या जैतळवाडीच्या दिशेने गेला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता कळसंबर येथील गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या दिसून आला बघता बघता या ठिकाणी गावातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच एपीआय लक्ष्मण केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, खांडेकर ,डोंगरे यांनी धाव घेऊन शेतातील नागरिकांना दूर केले .सुरुवातीला वाघ असल्याचे बोलले गेले मात्र वन विभागाचे वनाधिकारी अमोल मुंडे , दिनेश मोरे ,अच्युत तोंडे , दाखल झाले त्यांनी तो बिबट्या असल्याचे ओळखले मात्र हा बिबट्या हुलकावणी देत बाजूच्या जेतळवाडीच्या दिशेने पळाला. कळसंबर शिवारात शेतातून घरी जाताना आजिनाथ वाघमारे (वय ४०)या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील अनेक गावात भितीचे वातावरण पसरले आहे.