बीड : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून आता राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील पाचही नगर पंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे, तर ६ नगरपालिकांची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तयारीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत आता कोणतेही बदल करू नयेत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असून बीड जिल्ह्यासह राज्यातील मुदत संपलेल्या नगर पंचायतींच्या निवडणूक जुलै ऑगस्ट महिन्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.
बीड जिल्ह्यातील केज, आष्टी, पाटोदा , शिरूर, वडवणी या ५ नगर पंचायतींसह राज्यातील अनेक नगर पंचायतींची मुदत मागेच संपली आहे. मात्र राज्यातील कोरोना परिस्थितिमुळे या संस्थांच्या निवडणूक घेण्यात आल्या नव्हत्या. सध्या या नगर पंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. मात्र आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. राज्य सरकारने देखील अनेक भागात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने देखील नगरपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत,. जुलै पासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करणे अपेक्षित असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने आता जिल्ह्यातील सर्व नगर पंचायती , नगरपालिका , जिल्हा परिषद आणि पंच्यात समित्यांच्या हद्दीत कोणतेही बदल करू नयेत असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात बीड जिल्ह्यातील ५ नगर पंचायतींच्या निवडणूक होतील असे संकेत मिळत आहेत.