Advertisement

जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 02/06/2021
बातमी शेअर करा

बीड-शहरातील नाळवंडी रोडवरील जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रूग्णाने दि.२८ मे रोजी स्वॅब दिला. त्यानंतर तो रूग्ण नाळवंडी रोडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार घेत होता. सदरील रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला असतांनाही त्याला कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले नाही.त्यामुळे बुधवारी (दि.२) सकाळी त्या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे मयताचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. 

 

             बीड येथील अमोल आमटे (वय-२५) याने दि.27 मे रोजी विष प्राशन केले होते. त्याला उपचारासाठी नाळवंडी रोडवरील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दि.२८ रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला. स्वॅब घेतल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार सुरूच होते. मात्र ४दिवस होवुनही तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? याचा रिपोर्ट संबंधित यंत्रणेने नाळवंडी रोडच्या जिल्हा रूग्णालयाला कळविला नाही. तेथील डॉक्टरांनीही रिपोर्ट मागवून घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे त्या तरूणावर विष प्राशन केल्याच्या अनुशंगानेच उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी अमोल आमटे याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी कोरोना रिपोर्टचे काय? अशी विचारणा केली असता तेथील डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. शेवटी नातेवाईकच रुग्णालयाच्या मदत केंद्रात रिपोर्ट घेण्यासाठी आले असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यांना तसा रिपोर्टही दिला गेला. नातेवाईकांनी तो रिपोर्ट नाळवंडी रोडच्या जिल्हा रूग्णालयात दाखवला असता तेथुन पुढे आरोग्य यंत्रणा हलली आणि त्यांनी मयत अमोल आमटे याचा मृतदेह पिपीई कीटमध्ये पॅक करून अंत्यविधीसाठी पाठवला. दरम्यान पाच दिवसापुर्वी स्वॅब देवुनही संबंधित रूग्णाला किंवा नातेवाईकांना त्याचा अहवाल कळवला जात नसेल तर हीं बाब अतिशय गंभीर आहे. कोरेाना पॉझिटिव्ह असतांनाही अमोल आमटे या रूग्णावर सामान्य उपचार करण्यात आले. त्याच्यावर कोरोनाचे उपचार झाले असते तर त्याचा जिव वाचला असता. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

Advertisement