Advertisement

बीडच्या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नाही : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा महासागर

प्रजापत्र | Tuesday, 11/08/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोनाचा संसर्ग रोखायचा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील ६ शहरे १० दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ही शहरे बंद होणार आहेत. मात्र त्याअगोदर मंगळवारी बीड शहरात गर्दीचे उच्चांक मोडले गेले आहेत.. उद्यापासून १० दिवस काहीच मिळणार नाही, त्यामुळे खरेदीसाठी लोक गर्दी करत असून मंगळवारी बीडच्या रस्त्यांवर पाय ठेवायला देखील जागा नसल्याचे चित्र पाहायला मिळाले . 
बीड शहराच्या सुभाष रोड, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स , डीपीरोड , पांगरी रोड, माळीवेस , मोंढा आदी सर्वच भागात तोबा गर्दी झाली असून वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांचे देखील हाल होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची घोषणा करून दोन दिवसांचा वेळ दिला होता. ती मुदत आज संपत असल्याने लोक शक्य तितकी खरेदी उरकण्याचा प्रयत्नात आहेत. यासाठी शारीरिक अंतराचा फज्जा उडवत लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यातून कोरोना प्रसार थांबणार का वाढणार याचे उत्तर मात्र प्रशासनच देऊ शकेल . 

(फोटो क्रेडिट : फोटोराज, बीड )
पोलिसांचा ताण वाढला 
दरम्यान सोमवारपासूनच बीडच नव्हे तर माजलगाव , परळी, अंबाजोगाई , आष्टी, केज या शहरांमध्ये देखील अचानक रस्त्यावरची गर्दी वाढली आहे. बीडच्या वाहतूक शाखेसोबतच इतर सर्वच ठिकाणी पोलिसांची मात्र गर्दी नियंत्रित करून वाहतूक सुरळीत करताना दमछाक होत आहे. त्यातच उद्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे त्याचीही जबाबदारी पोलिसांनाच घ्यावी लागणार आहे. यामुळे पोलिसांचा ताण वाढल्याचे चित्र आहे. 

Advertisement

Advertisement