बीड दि.२७ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १९३३ बळी गेले आहेत. यात दुसर्या लाटेत गेलेल्या बळींची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही सरकारी सोबतच खाजगी रूग्णालयातही मोठ्या प्रमाणावर मृत्यु होत आहेत. या मागे खाजगी दवाखान्यातही फिजीशिअनचे अपुरे राउंड आणि अप्रशिक्षीत स्टाफ हेच मोठे कारण ठरत असल्याचे समोर येत आहे. रेमडेसिवीरसारख्या औषधांचा वेळेवर न झालेला पुरवठा देखील काही मृत्युंना कारणीभूत ठरला आहे. खाजगी रूग्णालयांच्या डेथ ऑडीटमधून या बाबी समोर आल्या आहेत.
कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्युचे डेथ ऑडीट केले जावे असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार गुरूवारी बीडच्या जिल्हा रूग्णालयात जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयांमध्ये झालेल्या कोरोना बळींचे डेथ ऑडीट केले गेले. २२ रूग्णालयातील १८६ कोरोना बळींचे तज्ञांच्या समितीने ऑडीट केले. यात रूग्ण दाखल कधी झाला, त्याच्यावर काय उपचार केले, मृत्यु कधी झाला या बाबी तपासल्या गेल्या. त्यासोबतच रूग्णावर केलेल्या उपचाराची फाईल आणि रूग्णाच्या दैनंदीन तपासणीच्या नोंदी समितीने पाहिल्या.
यातून अनेक प्रकरणात फिजीशिअनचा दिवसातून एक किंवा दोनच वेळा राउंड होतो हे अनेक प्रकरणात समोर आले आहे. फिजीशिअनने किमान प्रत्येक आठ तासाने रूग्णाला पहाणे आवश्यक आहे मात्र बहूतांश ठिकाणी तसे होत नसल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक रूग्णालयामधील स्टाफ अप्रशिक्षीत असल्याचे देखील डेथ ऑडीटमध्ये समोर आले आहे. अनेक प्रकरणात ‘व्हिजीलंट मॉनिटरींग’ होत नसल्याचे देखील समोर आले असून संबंधीत रूग्णालयाला तसे कळविण्यात आले आहे.
मागच्या काही काळात अनेक खाजगी रूग्णालयांनी कोविड हॉस्पिटल सुरू केले. ज्या ठिकाणी कायम स्वरूपी फिजीशिअन नाही अशाही काही रूग्णालयांनी कोविडवर उपचार सुरू केले. यासाठी बाहेरच्या फिजीशिअनची कन्सेंट घेण्यात आली. अनेक ठिकाणी नेत्रविकार तज्ञ, स्त्री रोग तज्ञ किंवा इतर डॉक्टरांनी कोविड सेंटर सुरू केले. जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या पाहता त्याची आवश्यकता होतीच मात्र अनेक रूग्णालयात फिजीशिअन २४ तास उपस्थितीत नसल्याचे चित्र होते. त्यासोबतच कोविड वार्डात काम करण्यासाठी पुरेसा स्टाफ मिळत नसल्याने जे मिळतील त्यांच्याकडून कामे करून घेण्याची परिस्थिती ठिकठिकाणी पहायला मिळाली यामुळे देखील रूग्णांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील २२ हॉस्पिटलमधील १८६ मृत्युंचे ऑडीट करण्यात आले. डॉ.आर.बी.देशपांडे, डॉ.प्रशांत रेवडकर, डॉ.अर्जुन तांदळे, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.जयश्री बांगर, डॉ.शिरीष गुट्टे, डॉ.महेश माने आणि डॉ.सुधीर राऊत यांच्या टिमने हे ऑडीट केले. यावेळी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील मेडीसीन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक देखील उपस्थितीत होते.