Advertisement

काळवटी तलावात पोहताना १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 26/05/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई- शहरापासून जवळच असणाऱ्या काळवटी तलावात पोहत-पोहत दूरपर्यंत गेलेली वैष्णवी वशिष्ठ भोसले (वय १५) ही मुलगी पाण्यात बुडाली. तिला तातडीने बाहेर काढून स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (२६ मे) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. वैष्णवी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंबाजोगाई शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले यांची मुलगी होती.

 

 

वशिष्ठ भोसले हे नेहमी त्यांच्या मुलांना घेऊन पोहण्यासाठी काळवटी तलावात जात असत. बुधवारी सकाळी देखील ते मुलगी वैष्णवी आणि मुलाला घेऊन पोहण्यासाठी गेले होते. वैष्णवीला चांगले पोहता येत असल्याने तिने पाण्यात उडी मारली. पोहत-पोहत ती तलावात बरीच दूरपर्यंत गेली. परंतु, दमल्यामुळे ती पाण्यात बुडाली असा अंदाज आहे. वैष्णवी बुडत असल्याचे पाहून वशिष्ठ भोसले, कृष्णा लोखंडे आणि अन्य काही तरुणांनी तातडीने पोहत पोहत तिच्याकडे जाऊन तिला पाण्याबाहेर काढले. परंतु, शरीरात पाणी गेल्यामुळे वैष्णवी अत्यवस्थ झाली होती. तिला तत्काळ स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. थोडा वेळ ती शुद्धीत आली आणि बोलली देखील होती अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु नंतर तिची तब्येत अधिक खालावली आणि तिचा मृत्यू झाला.

 

संघाचे शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले यांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या गावाकडून येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मेंढी फार्म परिसरातील स्वतःचे राहते घर रिकामे करून दिले. या अडचणीच्या काळात जमेल ती मदत ते सर्वांना करत आहेत. अशा परोपकारी पित्याची मुलगी वैष्णवी ही देखील गुणवान होती. वैष्णवी नुकतीच दहावीतून ११ वीच्या वर्गात जाणार होती. शिक्षणासोबतच इतर क्षेत्रातही ती अग्रेसर होती. परोपकारी पित्याच्या गुणी मुलीच्या निधनाने सर्वत्र हळहल व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement