Advertisement

बीड : 'मी एचआयव्हीचा रुग्ण आहे, मला दर महिन्याला औषध घ्यायला यावं लागतं म्हणून सरकारी दवाखान्यात आलो होतो ' असे म्हणत पोलिसांना कागदपत्रे दाखवून हात जोडणाऱ्या दुचाकीस्वाराला तुझ्या गाडीचे आरसीबुक दाखव, आम्हाला तुझ्या गाडीवर डाउट आहे असे म्हणत तासभर अडवून ठेवणाऱ्या बीड ग्रामीण पोलिसांनी त्याच वेळी त्यांच्या समोरून गेलेल्या आणि नम्बर देखील नसलेल्या कितीतरी हायवांना साधे अडविण्याची देखील तसदी घेतली नाही. सामान्यांवर डाऊट खात हायवांना सॅल्यूटचा हा प्रकार बीड ग्रामीण पोलिसांची कर्तव्यदक्षता दाखवीत आहे.

 

बीड जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनचे निर्बंध पाळण्याच्या नावाखाली पोलिसांकडून होणाऱ्या छळाचे रोज नवे प्रकार समोर येत आहेत. त्यातही बीड ग्रामीण पोलिसांनी तर माणुसकी सोडा , स्वतःचे वेगळे असे नियम सुरु केले आहेत. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या कर्तव्यदक्ष नियोजनातून बीड ग्रामीण पोलीस केवळ सामान्यांवर दंडुका उगारत आहेत.
मंगळवारी याचा प्रत्यय बीड शहरात प्रवेश करण्याच्या तपासणी नाक्यावर आला. बीडमधून एका दुचाकीवर पिता पुत्र मांजरसुम्भ्याकडे जात होते . तपासणी नाक्यावर त्यांची दुचाकी अडविण्यात आली. त्यांनी पोलिसांना माझे वडील एचआयव्हीचे रुग्ण आहेत, आम्ही औषध घ्यायला आलो होतो असे सांगितले. सरकारी दवाखान्याची चिट्ठी आणि गोळ्या देखील दाखविल्या. मात्र पोलिसांनी अगोदर लायसन दाखवायला सांगितले, संबंधिताने लायसन दाखविले तर मग गाडीचे आरसीबुक पाहण्याची इच्छा कर्तव्यदक्ष पोलिसांना आली. 'मला तुझ्या गादीवर डाऊट आहे ' अशी भूमिका पोलिसांनी घेतली आणि त्या व्यक्तीला तब्बल तासभर थांबवून घेतले.

 

 

दुचाकीवर आणि रुग्णावर डाऊट घेणारे बीड ग्रामीण पोलीस त्याचवेळी त्यांच्यासमोरून जाणाऱ्या आणि नंबरला काळे फसलेल्या , किंवा नंबरच नसलेल्या हायवांना मात्र साधे अडवून विचारपूस करायला देखील तयार नव्हते. त्यांच्यासमोरून हायवे भरून वाहत होत्या, त्या कोठून आल्या , बंद असताना काय वाहतूक सुरु आहे, आणि वाहनावर नम्बर का नाही ? का काळे फसले आहे ? असा कोणताही प्रश्न विचारण्यासाठी, किमान लोकलाजेस्तव तरी त्यांना दोन मिनिटे थांबवावे असेही पोलिसांना वाटत नव्हते. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी आखून दिलेल्या कर्तव्यदक्षतेच्या नियमात केवळ दुचाकीस्वारांवर डाऊट घेणेच येतेका ? आणि कोरोना केवळ सामान्य व्यक्तीच पसरवतो का ? वाळूच्या, गाळाच्या, राखेच्या हायवा कोरोनाप्रुफ आहेत का ? याचे उत्तर प्रत्येक ठाणेदाराला पाठीशी घालणारे पोलीस अधीक्षक देणार आहेत का जिल्हाधिकारी ?

Advertisement

Advertisement