बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवा वगळता शहरात सर्व काही बंद आहे.शहरात पोलिसांकडून टार्गेट पूर्तीसाठी अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही ओळखपत्र दाखवून ही ड्रायव्हींग लायसनच्या नावाखाली अडविण्यात येत आहे.शनिवारी (दि २२) सकाळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका डॉक्टराला लायसन्सच्या नावाखाली तब्ब्ल १ तास अडविण्यात आल्याची माहिती आहे.यामुळे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय.
जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. असे असले तरी अत्यावश्यक सेवेतील अथवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असल्यास अडवू नये, अशा सुचना असतानाही पोलिसांकडून पुन्हा मनमानी सुरू झाली आहे. सकाळी कोविड सेंटर व जिल्हा रूग्णालयासह कार्यालयात जाणाऱ्या डाॅक्टरांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अडविण्यात आले. ओळखपत्र दाखविल्यानंतर आपल्याकडचे ड्रायव्हींग लायसन दाखवा म्हणून तासनतास थांबवून ठेवण्यात आले. यामुळे त्यांना कर्तव्यावर जाण्यास उशिर झाला. यामुळे पोलिसांची मनमानी पुन्हा एकदा समोर आली आहे.
पावत्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारवाया..
सूत्रांच्या माहितीनुसार एका कर्मचाऱ्याला २५ कारवाया करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. हेच उद्दिष्ट पूर्ण करून वरिष्ठांना दाखविण्यासाठी या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. परंतू या निमित्ताने पोलिसांविरोधात रोष तयार होत आहे.
आधी ओळखपत्र नंतर हेल्मेट आणि आता ड्रायव्हिंग लायसन्सचा आग्रह
लोकं रस्त्यावर येऊ नये यासाठी पोलिसांनी सुरुवातीला ओळखपत्र बंधनकारक केले.नंतर हेल्मेटसक्ती आणि ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे कागपत्राचा आग्रह धरण्यात येत असल्याने पोलिसांनी काय ती एक नियमावली ठरवावी अशी मागणी नागरिकनांमधून होऊ लागली आहे.कोरोनाचा संसर्ग घटण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त गरजेचा आहे.त्याशिवाय रुग्णांच्या संख्येत घट होणार नाही मात्र असे असले तरी अत्यावश्यक सेवेतील लोकांना कागपत्रांच्या नावाखाली देण्यात येणार त्रास थांबला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.