बीड : जिल्ह्यात कडक करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात लोकांनी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून सध्या प्रशासन जमेल ते फंडे वापरात आहे. मात्र पोलिसांनी यातूनही महसूल 'वसुली ' सुरु केली आहे. रस्त्यावर आलेल्या वाहनधारकाला अगोदर बाहेर येण्याचे कारण विचारले जाते, ते असेल तर लायसन आहे का ? नंतर इन्शुअरन्स आहे का आणि हे सर्वच असेल तर गादीवर जुना दंड असेल तर अगोदर तो भरा असे फर्मावण्यात येत आहे. रुग्णांचे नातेवाईक अगोदरच भांबावलेले असतानाच पोलिसांच्या 'वसुली ' मोहिमेने त्यांच्या अडचणी वाढत आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी म्हणून लॉकडाऊन कडक करण्यात आलेला आहे, आणि या काळात लोकांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून पोलीस आणि प्रशासन प्रयत्न करीत आहे . मात्र आता पोलिसांचे हे प्रयत्न रोगापेक्षा उपाय जालीम असे ठरत आहेत. सध्या रस्त्यावर येणारांमध्ये मोठ्याप्रमाणावर लोक हे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. रस्त्यावर येणाऱ्या सर्वांची (वाळूवाले सोडून ) पोलीस चौकशी करीत आहेत हे योग्यच आहे. मात्र आता या चौकशीला 'वसुली ' मोहिमेचे स्वरूप येत असल्याच्या तक्रारी आहेत. समोरच्याला अगोदर कारण विचारले जाते, त्याने योग्य कारण सांगितले तर लायसन आहे का ? कागदपत्रे आहेत का ? अमुक गोष्ट आहे का ? असे विचारले जाते आणि यातील काहीही नसेल तर पावती फॅड, चलन काढा नाहीतर तडजोड करा असे पर्याय वापरले जात आहेत. यातील सर्व कागदपत्रे दाखविली तर तुमच्या गादीवर जुना दंड आहे, तो अगोदर भरा अशी भूमिका घेतली जात आहे. सध्या कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी वाहनांची सोय नसते , त्यामुळे अनेक लोक नातेवाईक, शेजारी यांची वाहने घेऊन येत आहेत, कोणाच्या वाहनावर जुना दंड आहे किंवा कोणाच्या वाहनांची सर्व कागदपत्रे आहेत का हे पाहायला अनेकदा रुग्णाच्या नातेवाईकांना वेळ नसतो , मात्र या परिस्थितीचा फायदा उठवत सध्या पोलिसांनी अडवणूक सुरु केल्याने गर्दी कमी करण्यासाठीचा रोगापेक्षा उपाय जळिंचा उपक्रम पोलीस राबवित असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.