बीड : येथील जिल्हा रुग्णालयात सध्या शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या उपचारात अनेक त्रुटी आहेत. डॉक्टर वेळेवर येत नाहीत , रुग्णाकडे लक्ष द्यायला स्टाफला वेळ नाही, वॉर्डात मोठ्याप्रमाणावर गैरसोयी आहेत , रुग्णाचे नातेवाईक वॉर्डात असले की ते त्याचे व्हिडीओ काढतात, बाहेरच्यांना कळवितात आणि हे झाकण्यासाठी म्हणून आता आरोग्य विभागाला रुग्णाचे नातेवाईक मध्ये नको आहेत. रुग्णासोबत एकही नातेवाईकाला वॉर्डात सोडू नका असे पत्रच बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांनी पोलिसांना दिले आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे मोठ्याप्रमाणावर रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफची संख्या पहिली तर त्यांच्यावर या मोठ्या रुग्णसंख्येचा ताण आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आतील व्यवस्था तोकडी पडत आहे, मात्र त्यासोबतच रुग्णालयातील उपचारातील त्रुटी देखील समोर येत आहेत. त्यामुळे आता रुग्णालय प्रशासनाने वॉर्डात रुग्णांचे नातेवाईक नको अशी भूमिका घेतली असून यासाठी नातेवाईकांमुळे उपचारात अडचणी येतात असे कारण पुढे केले आहे. तसे पत्र पोलिसांना दिले आहे.
-
नातेवाईक सुपरस्प्रेडर , तर उपचार करणारे आणि वॉर्डबॉय कोण ?
कोरोना वॉर्डात नातेवाईक येतात, आणि ते बाहेर पडून पुन्हा विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते असे गृहीत धरून प्रशासन नातेवाईकांना वॉर्डात येऊ देऊ नका असे म्हणत आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपायुक्त साऱ्यांचीच हीच भूमिका आहे. मात्र वॉर्डातून केवळ नातेवाईकच रोज बाहेर पडतात असे नाही. वॉर्डातील वॉर्डबॉय, स्टाफ आणि इतर लोकही रोज आतबाहेर करीत असतात. ते सारेच काही पीपीई किट देखील वापरीत नाहीत.पूर्वी कोरोना वॉर्डातील स्टाफला तेथेच १४ दिवस क्वारंटाईन केले जायचे त्यावेळी प्रसाराची बाब ठीक होती. आता कोणालाच क्वारंटाईन ठेवण्यासारखी स्थिती नाही, मग आता केवळ नातेवाइकांनाच अटकाव करून प्रशासनाला काय सध्याचे आहे.
नातेवाईक बाहेर काढताच वाढले मृत्यू
मागील आठवडाभरापासून बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रशासनाने 'नातेवाईक हटाव ' ची मोहीम पोलिसांना पुढे करून सुरु केली आहे. मात्र मागच्या आठ दिवसात मृत्यू देखील वाढले आहेत. अनेक रुग्ण वृद्ध आहेत, त्यांना स्वतः जेवता येत नाही किंवा आधार घेतल्याशिवाय लघवीला देखील जात येत नाही. एकेक वॉर्डात दाखल रुग्णांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे, इतक्या रुग्णांना मदत करायला पुरेसा स्टाफ वॉर्डात नाही. मग नातेवाईक देखील नसतील तर गंभीर रुग्णांनी कोणाकडे पाहायचे ? यामुळेच नातेवाईक जवळ नसल्याच्या धक्क्यानेच काही रुग्णांचे मृत्यू झाले आहेत, आरोग्य प्रशासनाची हीच भूमिका राहिली तर मृत्यू आणखी वाढतील.