बीड-क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोघा सख्ख्या भावांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना १७ मे रोजी रात्री ११ वाजेदरम्यान बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली.याप्रकरणी आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी नागापूर खुर्दमधील एका नदीजवळील पडक्या घरातून बुधवारी सकाळी अटक केली असून त्याला उद्या (दि.२०) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके (२३) याच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी हा वाद गावातच मिटवण्यात आला होता; परंतु सोमवारी परमेश्वर याने राम व लक्ष्मण साळुंके या दोघांना फोन करून झालेल्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ केली. त्यानंतर परमेश्वरला समजवण्यासाठी व शिवीगाळ केल्याचे त्याच्या आई-वडिलांना सांगण्यासाठी सोमवारी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके त्याच्या घराकडे निघाले होते. दरम्यान, आपल्या घरी ते दोघे येणार असल्याची माहिती परमेश्वरला मिळाली. राम व लक्ष्मण साळुंके यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने परमेश्वर कुऱ्हाड घेऊन त्याच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसला.
राम व लक्ष्मण साळुंके दिसताच परमेश्वर साळुंके याने त्यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने घाव घातले. या हल्ल्यात दोघेही जागीच गतप्राण झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. तोपर्यंत आरोपी परमेश्वर साळुंके त्या ठिकाणावरून फरार झाला होता. आज सकाळी त्याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान आरोपीच्या मागावर तीन पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला जेरबंद केले आहे.
कुटुंब उघड्यावर
राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके हे दोघेही शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मुलांचे शिक्षणदेखील सुरू होते. मात्र, क्षुल्लक कारणावरून त्यांच्या मुलांच्या बरोबरीचा असलेल्या आरोपी परमेश्वर याने त्यांचा खून केल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे.