Advertisement

बीड जिल्हा परिषदेचे दातृत्व,रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलेंडर 

प्रजापत्र | Sunday, 02/05/2021
बातमी शेअर करा

 बीड – बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवल्याप्रमाणे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सर्व अधिकारी तसेच जिल्हा परिषदेशी संलग्न असलेले अभियंते यांनी लोकसहभागातून बीड जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलेंडर देण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार आज ५७ जम्बो सिलेंडर आणून ते जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहेत. तर उर्वरित ४३ सिलेंडर देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार यांनी दिली आहे.

 

 

पालकमंत्री धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, तसेच जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ही बाब साकारली आहे. शासकीय आयटीआय येथेही आणखी एक कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे, त्यासाठीही या सिलेंडर्सचा उपयोग होणार आहे.

 

 

एकीकडे रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर दुसरीकडे विविध जनरेशन प्लांट वर व आयात केलेल्या ठिकाणी ऑक्सिजन भरून ठेवण्यासाठी सिलेंडर कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत हे ५७ जम्बो सिलेंडर निश्चितच आरोग्य यंत्रणांसाठी फायदेशीर ठरणार आहेत, आणखी ४३जम्बो सिलेंडर लवकरच उपलब्ध करून देऊ; असे जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट यांनी म्हटले आहे.

 

जिल्हा परिषद प्रांगणात आज हे ५७ जम्बो सिलेंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. यशोदा जाधव, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती सौ. सविता मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते  आदी उपस्थित होते. बीड जिल्हा परिषदेने सामाजिक बांधिलकी जपत हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement