Advertisement

ग्राहकांच्या गरजेनुसार दिलं तरच व्यवसायात यश मिळतं

प्रजापत्र | Tuesday, 04/08/2020
बातमी शेअर करा

कोणताही व्यवसाय ग्राहकांच्या गरजेवर चालतो. ग्राहकांना काय आवडतं, काय आवडत नाही याचा विचार करता आला पाहिजे. ते लक्षात घेऊन त्या पध्दतीनं आपण ग्राहकाला देवू शकलो तरच व्यवसायात यश मिळतं. हॉटेलच काय आणखी कुठल्याही व्यवसायाला हेच तत्व लागू होत या शब्दात व्यवसायातील यशाचं रहस्य हॉटेल अन्वीताचे मालक वाय जनार्दन राव मांडतात.
----
वाय जनार्दन राव,40-45 वर्षापूर्वी अवघे 400 रूपये खिशात घेवून बीडला आलेला, डोळ्यात एक जिद्द असलेला तरूण. हा स्वत:च हॉटेल उभारण्याचं स्वप्न पाहतो काय आणि त्यासाठी झपाटल्यागत काम करत ते स्वप्न सत्यात उतरवतो काय. हा साराच प्रवा सर्वांनीच प्रेरणा घ्यावा असा आहे. जिथं आलो, जिथं व्यवसाय उभारला आता तेच माझं गाव. माझा जन्म कर्नाटकातला असेल पण मी बीडकरच आहे असं निक्षून सांगणारे वाय जनार्दन राव हे व्यक्तीमत्व उद्योगासोबतच रोटरी, व्यापारी संघटना यामध्येही कार्यरत आहे. या व्यक्तीमत्वाच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
---

या मुलाखतीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 
https://youtu.be/dCnk0mrtRBA

प्रश्‍न-बीडमध्ये हॉटेल अन्वीतासारखं हॉटेल उभारलं, उद्योग जगतात स्वत:चं नाव केलं आता या टप्यावरून मागे वळून पाहताना नेमकं काय वाटतं?
वाय जनार्दन राव-
आजच नव्हे तर कोणत्याही काळात आयुष्याकडे पाहिलं तर एकच तत्व मला लक्षात राहतं ते म्हणजे तुमच्यात प्रामाणिकपणा असेल, जिद्द असेल, आत्मविश्‍वास असेल आणि त्या सर्वांच्या जोडीला तुम्ही तितकी मेहनत घेतली तरच तुम्ही यशस्वी होवू शकता.
प्रश्‍न-आज आपण जे यश मिळवलं आहे त्यामागची ताकद काय आहे?
वाय जनार्दन राव-  
कोणताही व्यवसाय ग्राहकांच्या गरजेवर चालतो. ग्राहकांना काय आवडतं, काय आवडत नाही याचा विचार करता आला पाहिजे. ते लक्षात घेऊन त्या पध्दतीनं आपण ग्राहकाला देवू शकलो तरच व्यवसायात यश मिळतं. हॉटेलच काय आणखी कुठल्याही व्यवसायाला हेच तत्व लागू होत.
प्रश्‍न-तुमची नेमकी सुरूवात कशी झाली?
वाय जनार्दन राव-
मी सातारा जिल्ह्यात एका हॉटेलमध्ये सर्व्हिस करायचो. त्यावेळी म्हणजे आजपासून 50वर्षापूर्वी मी स्वत:च्या हॉटेलचं स्वप्न पाहिलं आणि 1976 ला ते स्वप्न घेवून बीडला आहो.
प्रश्‍न-तुम्ही सातार्‍यात काम करायचो म्हणालात, म्हणजे आपण मुळचे कुठले?
वाय जनार्दन राव-
माझा जन्म कर्नाटकातला. पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे म्हणूनच मी महाराष्ट्रीयनच आहे.
प्रश्‍न-आपली आर्थिक परिस्थिती काय होती?
वाय जनार्दन राव-
1963 ला मी हॉटेलात महिना 40 रू पगारावर काम करत होतो. यावरून परिस्थिती तुम्ही समजून घ्या.
प्रश्‍न-मग अशा परिस्थितीत हॉटेलचं स्वप्न कसं पाहिलं?
वाय जनार्दन राव-
याला कारण आमचे दादाजी. त्यांचं सातार्‍यात हॉटेल होतं. तिथं काम करताना एकदा  ते माझ्यावर रागावले. ते मला अपमानजनक वाटलं. त्याचवेळी यांच्या सारखंच मोठं हॉटेल स्वत:चं बनविन असा निर्धार मी त्यावेळी केला. तेंव्हा मला त्यांचा राग आला होता. पण आता त्यांच्यामुळेच हे होवू शकलं असं वाटतं. त्यावेळी ते माझ्यावर रागावले नसते तर आजही मी त्यांच्या हॉटेलात मॅनेजर म्हणूनच राहिलो असतो.
प्रश्‍न-मग बीडला आल्यानंतर प्रवास कसा राहिला?
वाय जनार्दन राव-
मी सुरूवातीला बीडच्या एसटी. कँटीन मध्ये काम केलं. त्यानंतर गणेश उडपी सुरू झाली. आणि त्यानंतर हॉटेल व्यवसायात आणखी काय काय करता येईल. याचा विचार करून अन्विता हॉटेल सुरू झालं.
प्रश्‍न-व्यवसाय करायचाय पण आमच्याकडे पैसा नाही हे जे कारण सांगितलं जातं त्याबद्दल काय सांगाल?
वाय जनार्दन राव-
खरं सांगायचं तर व्यवसायासाठी पैशाची नाही तर मानसिक इच्छेची गरज असते. पैसा लागत नाही असं नाही तो लागतोच पण मानसिक इच्छा असेल तर पैसा उपलब्ध करता येतो. माझं स्वत:चं उदाहरण सांगायचं तर बीडला येताना माझ्याकडे केवळ 400 रूपये होते. पण मी हॉटेलचं स्वप्न पाहिलं. त्या दिशेने काम सुरू केलं. गणेश उडपीची सुरूवात झाल्यानंतर बीडच्या लोकांचा विश्‍वास जिंकला, मेहनत केली, जनतेचं प्रेम मिळवलं आणि त्यातून माझा व्यवसाय उभा राहिला. म्हणूनच पैशाचं कारण सांगून व्यवसायापासून दूर जाता येत नाही. तुमची विश्‍वासार्हता असेल, तुमच्याबद्दल आपुलकी असेल तर कोणत्याही व्यवसायात लोक मदत करतात.
प्रश्‍न-पण हा विश्‍वास कसा संपादन करायचा?
वाय जनार्दन राव-
आपला व्यवहार चोख ठेवला, आपण स्वत:प्रती आणि समाजाप्रती प्रामाणिक राहिलोत. सेवा देताना तत्परता दाखविली आणि गुणवत्ता ठेवली तर विश्‍वास संपादन करणे अवघड नसते.
प्रश्‍न-30 वर्षापूर्वी बीडसारख्या ठिकाणी खरंच हॉटेल व्यवसायाला स्कोप होता का?
वाय जनार्दन राव-
स्कोप शोधायचा असतो. त्यावेळी बीडमध्ये एकही हॉटेल नव्हतं. छोट्या टपर्‍या असायच्या. अशा परिस्थितीत कुटुंबाला घेवून जेवायला जाता येईल असं कुठलंही ठिकाण बीडमध्ये नव्हतं. मग आपण तसं ठिकाण उपलब्ध करून दिलं तर ग्राहक मिळतील हे लक्षात आलं. आणि त्यातून स्कोप निर्माण झाला.
प्रश्‍न-या सर्व प्रवासात काही अडचणी आल्या का?
वाय जनार्दन राव-
अडचणी असतातच. कोणालाच काही सहज मिळत नाही आणि सहज मिळालं तर त्याची किंमतही राहत नाही. त्यामुळे अडचणी आल्याच पाहिजेत. अडचणी आल्याशिवाय शिकता येत नाही.
प्रश्‍न-तरी सर्वात मोठी अडचण कोणती होती?
वाय जनार्दन राव-
मी अन्विता हॉटेल उभारण्याचे ठरविलं. त्यावेळी मला एकाही बँकेने उभंही केलं नाही. तीच मोठी अडचण होती. त्यामुळं अन्विताचं बांधकाम सुरू करायला दोन वर्ष उशिर लागला.
प्रश्‍न-त्यातून बाहेर कसे पडलात?
वाय जनार्दन राव-
त्यावेळी महाराष्ट्र फायनान्स कॉर्पोरेशनच्या मॅनेजरची ओळख झाली. त्यांनी मला बोलावून कर्ज दिलं आणि एकदा बांधकाम सुरू झाल्यावर अनेक बँकांनी आम्ही कर्ज देवू असे प्रस्ताव दिले.
प्रश्‍न-सुरूवातीला उभं न करणार्‍या बँका कर्ज द्यायला तयार झाल्या. त्यावेळी काय वाटलं?
वाय जनार्दन राव-
बँकांनी सुरूवातीला कर्ज नाकारलं म्हणजे त्या वाईट होत्या असे नाही. शेवटी बँकांचे काही नियम असतात. आपण त्यांच्यामध्ये स्वत:बद्दल विश्‍वासार्हता निर्माण केली पाहिजे. ती झाली की लोक मदत करतात. नंतरच्या काळात मला बँकांची खूप मदत झाली. त्यामुळेच माझे व्यवसाय वाढले.
प्रश्‍न-उद्योगासोबतच आपण व्यापारांच्या संघटनेचं नेतृत्व केलं. मूळचा बीडचा नसलेला व्यक्ती बीडमध्ये कसं संघटन बांधतो?
वाय जनार्दन राव-
मी बीडचा नाही. हे माझ्या मनातच येत नाही. माझा जन्म कर्नाटकातला असेल पण मी इथलाच आहे. महाराष्ट्राचा आहे. आणि आपण ज्या गावात व्यवसाय करतो. जिथल्या जनतेनं आपल्याला भरभरून दिलं त्या भागाच्या विकासात आपल्याला योगदान देता आलं पाहिजे.
प्रश्‍न-आज जी लॉकडाऊनची परिस्थिती आहे त्याकडे कसं पाहता?
वाय जनार्दन राव-
लॉकडाऊनमुळे सर्वांच्याच अडचणी वाढल्यात. सगळेच उद्योग अडचणीत आलेत. आमच्या व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. अनेकांनी कर्ज काढून उद्योग उभारले आहेत. त्यांच्या समोरच्या अडचणी अनेक आहेत. पण आपल्याला या संकटाचा मुकाबला करावा लागणार आहे. खचून न जाता उद्याचा दिवस चांगला असेल या विश्‍वासनं काम करावं लागेल.
प्रश्‍न-उद्योगापलिकडची आपली आवड काय?
वाय जनार्दन
राव-मैत्री, प्रवास करणे आणि सगळ्यांसोबत प्रेमाने राहणे.
प्रश्‍न-आपल्यावर प्रभाव कोणाचा आहे?
वाय जनार्दन राव-
यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांचा.
प्रश्‍न-राजकारण्यांचा प्रभाव तुमच्यावर कसा?
वाय जनार्दन राव-
मी सातारा येथे असताना यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई आमच्या हॉटेलात थांबायचे. त्यावेळी त्यांच्या सेवेची संधी मिळाली. त्यांना जवळून अनुभवता आलं. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना जे काही सांगायचे ते तत्वज्ञान मला आवडलं. ते राजकारणाबद्दल बोलायचे पण मी ते व्यवसायात वापरलं. म्हणूनच त्या दोघांना मी आयुष्यात विसरू शकत नाही.
प्रश्‍न-काय होतं ते तत्वज्ञान?
वाय जनार्दन राव-
ते ग्रामपंचायतीच्या आणि नगरपालिकेच्या सदस्यांना, कार्यकर्त्यांना सांगायचे की तुम्ही जनतेसाठी पाच वर्ष चांगलं काम करा, जनतेचा विश्‍वास संपादन करा. ती जनता तुम्हाला कधीच अपयशी होवू देणार नाही. हेच तत्वज्ञान मी व्यवसायासाठी वापरायचं ठरविलं. आणि पाच वर्षासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी ग्राहकांचा विश्‍वास संपादन करायचा प्रयत्न करतोय.
प्रश्‍न-कधी राजकारणात यावं असं वाटलं नाही का?
वाय जनार्दन राव-
कधीच नाही. राजकारणा करणारांनी राजकारण करावं, व्यवसाय करणारांनी व्यवसाय करावा. व्यवसायातूनही समाजसेवा कराता येते.
प्रश्‍न-आपण रोटरीच्या माध्यमातून काम करता?
वाय जनार्दन राव-
होय. समाजसेवेचे रोटरी हे एक चांगलं माध्यम आहे. त्यातून काहींना मदत करता येते आणि मनाला आनंद मिळतो.
प्रश्‍न-हॉटेलसारख्या व्यवसायात सर्वच ग्राहकांचं समाधान करणं शक्य असतं का?
वाय जनार्दन राव-
कोणत्याच व्यवसायात सर्वाचंच समाधान करणं शक्य नसतं. हॉटेलात हजारो ग्राहक येतात. सगळेच संतुष्ट असतात असं नाही. ते तक्रारी मांडतात. प्रत्येकाला खुलासा देत बसणं शक्य नसतं. अशावेळी त्यांचं ऐकून घ्यायचं आणि खरोखर आपली काही चूक आहे का हे शोधून तसे बदल करायचे.
प्रश्‍न-विसरता न येणारा क्षण कोणता?
वाय जनार्दन राव-
हॉटेल अन्विताच बांधकाम 
प्रश्‍न-उद्योगात अडचणी येत असताना कधी हे सारं सोडून द्यावं असं वाटलं का?
वाय जनार्दन राव-
कधीच नाही.
प्रश्‍न-असं न वाटण्यामागचं शक्तीस्थान काय?
वाय जनार्दन राव-
अर्थात स्वत:वरचा आत्मविश्‍वास. तुमचा स्वत:वर विश्‍वास असेल तर कोणत्याच परिस्थितीचा कधीच त्रास होत नाही.
प्रश्‍न-भविष्यातलं स्वप्न काय?
वाय जनार्दन राव-
हा कोरोना लवकर संपावा आणि अधिक चांगल्या पध्दतीनं लोकांची सेवा करता यावी.
प्रश्‍न-उद्योगात येवू पाहणार्‍यांना काय सांगाल?
वाय जनार्दन राव-
उद्योगात टिकण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्‍वास आणि प्रामाणिकपणा लागतो. तो कमवा. एकदम श्रीमंत होण्याचं स्वप्न बाळगू नका. कोणत्याच व्यवसायात एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. झटकन यश कधीच मिळत नसतं. यश हे नेहमी टप्याटप्याने आणि मेहनतीने मिळतं. जे एका दिवसात मिळतं ते फार काळ टिकत नसतं.

 

Advertisement

Advertisement