बीड-राज्य सरकारने कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावले असताना ही अनेक ठिकाणी नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.शुक्रवारी (दि.२३) बीडमध्ये अश्याच मोकाट फिरणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,नगर नाका,बशीरगंज,सुभाष रोड,बार्शी नाका परिसरात पोलिसांचा खडा पहारा असल्याचे दिवसभर आढळून आले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक निर्बंध लावलेले आहेत. असे असताना काही सडकफिरे विनाकारण मोटारसायकल किंवा पायी रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत. अशा लोकांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असून बीडमध्ये दिवसभर पोलिसांकडून अनेकांना काठीचा प्रसाद देण्यात आल्याने दुपार नंतर रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान सध्या बीड शहरात पोलिसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळले नाही तर काठ्यांचा प्रसाद मिळणार हे निश्चित आहे असे म्हणावे लागेल.
बातमी शेअर करा