Advertisement

बीड जिल्ह्याला रोज ५०० रेमडीसेविर मिळणे देखील अवघड

प्रजापत्र | Friday, 23/04/2021
बातमी शेअर करा

बीड दि. २३ (प्रतिनिधी)-राज्यातच रेमडीसेविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, त्यातच आता केडणारा सरकारने महाराष्ट्राचाच या इंजेक्शनचा कोटा कमी केला आहे. राज्याला पुढील १० दिवसांसाठी २ लाख ६२ हजार इंजेक्शन मिळणार आहेत, म्हणजे राज्याला रोज २६ हजार इंजेक्शन मिळणार आहेत. त्यातले बीडच्या वाट्याला रोजचे ५०० देखील येणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनीच रेमडीसेविरला पर्याय शोधून उपचार करण्याची मानसिकता करावी लागणार आहे.

 

कोरोनाच्या उपचारासाठी सध्या रेमडीसेविर अत्यंत महत्वाचे समजले जाऊ लागले आहे. मात्र राज्यभरातच त्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तरुग्णांचे नातेवाईक एकेका इंजेक्शनसाठी  काहिही  करायला तयार आहेत मात्र  इंजेक्शन मिळायला तयार नाही. त्यातच आता पुढच्या १० दिवसांसाठी राज्याला केवळ २ लाख ६२ हजार इंजेक्शन मिळणार आहेत. म्हणजे प्रतिदिन २६ हजार इतकेच इंजेक्शन राज्याला उपलब्ध होतील असे नियोजन सध्यातरी आहे. राज्याच्याच वाट्याला रोज २६ हजार इंजेक्शन मिळणार असतील तर जिल्ह्यांच्या वाट्याला येणारे इंजेक्शन हे शेकड्यांध्ये असतील.

 

 

रुग्ण संख्येच्या प्रमाणात होणार वाटप
राज्याला मिळू शकणाऱ्या इंजेक्शनची प्रमाण केंद्राने ठरविल्यानंतर आता राज्याच्या औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी या इंजेक्शनच्या समन्यायी वाटपाचे सूत्र तयार केले असून त्या सूत्रानेच प्रत्येक जिल्ह्यांना रोज इंजेक्शन दिले जाणार आहेत. जिल्ह्याचतील रुग्णसंख्येच्या प्रमाणात राज्याला उपलब्ध होणारे इंजेक्शन वाटले जाणार आहेत. बीड जिल्ह्याचे सक्रिय रुग्णांचे प्रमाण राज्याच्या १ . ६६ % इतके आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला त्याच प्रमाणात इंजेक्शन मिळणार आहेत. जर राज्याला २६ हजार इंजेक्शन मिळणार असतील तर बीड जिल्ह्याच्या वाट्याला रोज फारतर ४३० इंजेक्शन येऊ शकतील.

 

 
पर्याय शोधावे लागणार
बीड जिल्ह्यात सध्याची जी रुग्णसंख्या आहे ती पाहता रोज किमान दिड ते दोन हजार इंजेक्शनची मागणी निर्माण होत आहे. रोज डॉक्टर रुग्णांना इतक्या मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन लिहून देत आहेत. मात्र आता मागणीच्या २५ ५ देखील इंजेक्शन उपलब्ध होणार नसतील तर डॉक्टरांना देखील उपचाराच्या वेगळ्या पर्यायांची चाचपणी करावी लागणार आहे. रेमडीसेविर हे इंजेक्शन महत्वाचे असले तरी ते मृत्यू कमी करते असे कोठे समोर आलेले नाही असे आता टास्क फोर्सचे लोक देखील सांगत आहेत. तर रुग्णाचे निदान तात्काळ झाले आणि लगेच प्राथमिक स्वरूपाचे अँटिव्हायरल आणि स्टिरॉइड सुरु केले तर रेमडीसेविर्चा वापर न करता देखील उपचार करता येतात असे अनेक डॉक्टर खाजगीत बोलत आहेत. फॅबिफ्लू गोळ्यांचा वापर करून देखील उपचार करता येऊ शकतो असेही तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता डॉक्टरांना रेमडीसेविरवर फार विसंबून न राहता उपचारांच्या वेगळ्या पद्धती शोधाव्याच लागणार आहेत.

 

Advertisement

Advertisement