तर अंबाजोगाईत वेळेत पोहचला असता ऑक्सिजन
बीड : जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. प्रशासनातले अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत आहेत. मात्र असे असताना औरंगाबादहून आलेले ऑक्सिजन सिलेंडर तब्बल आठ तास जिल्हाधिकारी कार्यालयातच पडून राहिले आणि ते अंबाजोगाईला उशीरा पोहचले. दरम्यानच्या काळात अंबाजोगाईच्या रुग्णालयात अनेक रुग्णांचा बळी गेला होता. औरंगाबादहून आल्याबरोबर हे सिलेंडर अंबाजोगाईला पोहचले असते तर कदाचीत काहींचा जीव वाचला असता. मात्र याच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या बीडच्या तहसीलदारांचा निष्काळजीपणा ऑक्सिजन पुरवठ्यातही आडवा आला आहे.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मिळेल तेथून ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी झटत आहेत. ऑक्सिजन निर्मिती केंद्रावर महसूलचे अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस बसून आहेत. मात्र बीडच्या तहसीलदारांचा ऑक्सिजन पुरवठ्याचा निष्काळजीपणा आता समोर आला आहे. बुधवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास बीडमध्ये औरंगाबाद-जालना येथून तब्बल 48 सिलेंडर घेवून तलाठी सचिन सानप आणि इतर कर्मचारी पोहचले होते. दुसरीकडे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाने मंगळवारपासून सिलेंडरची मागणी नोंदविलेली होती या तलाठ्यांनी 48 सिलेंडर मध्यरात्री बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. हे सिलेंडर तातडीने अंबाजोगाईला पाठविण्याची जबाबदारी बीडचे तहसीलदार शिरीष वमने यांच्यावर टाकण्यात आली होती. मात्र अंबाजोगाईहून ऑक्सिजनची निकडीची मागणी असताना आणि रात्री 2 वाजता सिलेंडर आलेले असतानाही बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत बीडहून ते सिलेंडर निघालेच नाही. सकाळी 10 वाजता नायब तहसीलदार राऊत यांचे पथक हे सिलेंडर घेवून अंबाजोगाईला गेले. जर हे सिलेंडर एक तास अगोदर जरी अंबाजोगाईला पोहचले असते तरी अंबाजोगाईत रुग्णालयातील चित्र वेगळे असते.
अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात बुधवारी मध्यरात्रीनंतर तब्बल 11 बळी गेले. यातील काही बळी ऑक्सिजन पुरवठ्याअभावी गेले असा नातेवाईकांचा आरोप आहे. रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळला असला तरी रुग्णालयाला ऑक्सिजनची मोठी निकड होती हे तर स्पष्ट आहे. मग अशा अडचणीच्या काळात बीडहून अंबाजोगाईला सिलेंडर पाठवायला तहसीलदारांना आठ तास का लागले हे कोडे आहे. या संदर्भात महसुल प्रशासनाकडून मात्र कोणतेही उत्तर मिळायला तयार नाही.