Advertisement

कोरोना २, रेमडेसविर, लस व आपण

प्रजापत्र | Wednesday, 21/04/2021
बातमी शेअर करा

येणार येणार असे ज्याबद्दल म्हणत होतो ती करोनाची दुसरी लाट, नव्हे त्सूनामी आपल्या समाजात शेवटी आलीच. मागील लाट व यामध्ये एक मुख्य फरक हा आहे की यावेळेस जवळपास प्रत्येकानेच आपला जवळचा किंवा लांबचा नातेवाईक करोनाच्या  विळख्यात अडकलेला पाहिला आहे. करोनाचे हे रौद्र स्वरूप आपण प्रत्यक्ष किंवा रोज पेपर मध्ये बघतोच आहोत. त्या निमित्ताने काही मूलभूत शंका सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाले आहेत.
त्यामधील रोज वाचनात येणाऱ्या गोष्टी म्हणजे  सिटीस्कॅन, रेमडेसविर इंजेक्शन व करोनाची लस.
 याबद्दल सर्वसामान्यांना समजेल अशी माहिती देऊन त्यांच्या शंका निरसनासाठी हा लेखन प्रपंच!

 

सिटिस्कोअर म्हणजे काय ?
 करोना झाला की हमखास डॉक्टर छातीचा सिटीस्कॅन काढायला लावतात. या सिटीस्कॅन मध्ये करोनाचा संसर्ग फुप्फुसात किती प्रमाणात झाला आहे हे बघितले जाते. या सिटीस्कॅन मध्ये कोविड सिटी स्कोर ही गोष्ट सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. हा सिटीस्कॅन स्कोर  एकूण 25 गुणांचा असतो. रुग्णाचा स्कोर जितका जास्त तितका फुफ्फुसातील संसर्ग जास्त.
0 - ६ = हा स्कोर सौम्य समजला जातो. यामध्ये रुग्णाला जास्त धोका नसतो. व 90 टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज नसते.
७-१७= हा मध्यम स्कोर आहे. यामध्ये 50% जणांना ऑक्सिजन लागू शकतो व अशा लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागू शकते.
१८ -२५ = हा स्कोर तीव्र संसर्ग दाखवतो व अशा रुग्णांना ऍडमिट करावे लागतेच व ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर ची गरज लागू शकते.
रेमडीसेविर कोणाला आवश्यक ?
रेमडेसविर इंजेक्शन चे नाव आता जवळपास सगळ्यांनाच माहित झाले आहे व त्याहीपेक्षा त्या इंजेक्शन साठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ ही आपण अजून पाहतच आहोत. हे इंजेक्शन नक्की करोना च्या कोणत्या रूग्णांना द्यावे व त्याचा कितपत फायदा होतो हे आपण बघू या.
 सध्या करोनाच्या पेशंट्सना तीन विभागात विभागले जाते.
सौम्य - ज्यांना न्यूमोनिया (फुफुसाचा संसर्ग) नाही व ऑक्सिजनचे प्रमाण 98 च्या वरती आहेत ते.
मध्यम - ज्यांना न्यूमोनिया आहे पण ऑक्सीजन प्रमाण 94 च्या पुढे आहे. यामधील काही रुग्णांना ऑक्सीजन लागू शकतो व काहींना नाही
तीव्र -   ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण 94 चा खाली आहे.
 रेमडेसविर इंजेक्शन करोना च्या व्हायरसची वाढ थांबवते व त्याचा करोना विरुद्धचा प्रभाव हा सिद्ध झालेला आहे.
सौम्य व मध्यम करोना असलेले पेशंट ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही ते रुग्ण घरी सुद्धा उपचार घेऊ शकतात. अशा रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी सल्लामसलत करून घरून उपचार घ्यावेत. अशाने बेडची सध्या जाणवत असलेली प्रचंड कमतरता व त्याचप्रमाणे रुग्ण व नातेवाईकांना होणारा मनस्ताप व धावपळ कमी होऊ शकते.
• ज्यांना ऑक्सिजन फक्त मध्ये मध्ये लागतो किंवा अगदी कमी प्रमाणात जसे २-३ लिटर/मिनिट, अशा रुग्णांना सुद्धा जर कुठे बेड उपलब्ध नसेल तर ते घरी ऑक्सिजन घेऊ शकतात. ऑक्सीजन सिलेंडर घरी आणून किंवा जर तो मिळत नसेल तर ऑक्सीजन concentrator मशीन, जे हवेतील ऑक्सिजन काढून पुरवठा करते ते घरी आणून उपचार होऊ शकतात. अशा स्थिर प्रकृतीच्या रुग्णांना सुद्धा रेमडेसविर ची गरज नाही.
• मध्यम व तीव्र करोना चे रुग्ण ज्यांना सतत व जास्त प्रमाणात (4 लिटर /मिनिट व त्या पेक्षा जास्त) ऑक्सिजन लागतो अशा रुग्णांना रेमडेसविर ने फायदा होतो. अशा पेशंटना पण रेमडेसविर चा कोर्स पाच दिवस दिला तर फायदा होतो व जास्त दिवस देऊन काही जास्तीचा फायदा होत नाही.
• व्हेंटिलेटर वरच्या पेशंट ना मात्र पाच पेक्षा जास्त दिवस  रेमडेसविर लागू शकते.
 कोरोना लसीकरणाचे काय ?

 

 

भारतात तीन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत.
कोविशील्ड (Covishield)- जे ब्रिटीश कंपनी Oxford Astra Zeneca ने बनवले आहे.
कोव्हॅक्सिन(Covaxine) - जे भारतात ,भारत बायोटेक या कंपनीने बनवले आहे.
Sputnik V - हे रशियन व्हॅक्सिन आहे.
• कोवीशील्ड या लसीची क्षमता (efficacy) 90% पर्यंत आहे. म्हणजेच लस दिलेल्या लोकांमध्ये नव्या करोना ची लागण होण्याचे प्रमाण 90 टक्क्याने कमी होते.
कोव्हॅक्सिन ची क्षमता 81% पर्यंत आहे व sputnik V जी क्षमता 92 % पर्यंत आहे.
• कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड यांचा दुसरा डोस हा साधारणता 28 दिवसानंतर दिला जातो पण असे लक्षात आले आहे की जर दुसरा डोस सहा किंवा आठ आठवडे नंतर घेतला तर त्याचा अजून चांगला परिणाम होतो.
• Sputnik V या लसीचा दुसरा डोस हा तीन आठवड्यांनंतर घ्यायचा आहे.
• ज्या लसीचा पहिला डोस घेतलाय त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा. लस बदलू नये कारण प्रत्येक लस ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली आहे.
• ज्यांना करोना होऊन गेलाय अशा लोकांनी पण पूर्णपणे बरे झाल्यावर साधारण एक महिन्यानंतर लस अवश्य घ्यावी याचे कारण लस मुळे जी प्रतिकारक्षमता निर्माण होते ती करोना झाल्यामुळे होणाऱ्या प्रतिकार क्षमतेपेक्षा जास्त स्थिर व प्रभावी असते. पण ज्यांना करोना च्या उपचारादरम्यान plasma किंवा antibody दिल्या असतील अशांनी मात्र लस तीन महिन्यानंतर घ्यावी.( संदर्भ - American Centre for disease control and prevention website)
• जर पहिला डोस दिला नंतर करोना झाला तर दुसरा डोस च्या वेळेपर्यंत जर तुमचा क्वारंटाईन( विलगीकरण)काळ संपला असेल व तुम्हाला करोनाची कुठलीही लक्षणे नसतील तर दुसरा डोस ठरलेल्या वेळेत घ्यावा.

 

• क्वचित प्रसंगी दोन्ही डोस घेतल्यानंतर करोना होऊ शकतो पण असे निदर्शनास आले आहे की आधी घेतलेली लस करोना ची तीव्रता कमी करू शकते जेणेकरून तीव्र करोना व्हायची शक्यता कमी होते. म्हणून लस घेणे हे आपल्या फायद्याचेच आहे.
• डायबिटीस, हार्ट पेशंट, किडनीचे रुग्ण यांना लस घेण्यात काहीच हरकत नाही उलट अशा लोकांनी प्राधान्यतेने लस घ्यावी कारण अशा लोकांमध्ये करोनाचा धोका जास्त असतो.
• लस घ्यायचा अजून एक उपयोग हा आहे की आगामी काळात अनेक ठिकाणी जसे परदेशप्रवास ,पर्यटन, सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी लस घेतल्याचे सर्टीफिकीट सक्तीचे होऊ शकते त्यामुळे असे सर्टिफिकेट आपल्या जवळ असणे आवश्यक आहे.

 

•सध्या जरी 18 वर्षावरील लोकांना लस देत नसले तरी लवकरच लहान मुलांसाठी लस चालू होईल तेव्हा आपल्या मुलांना लस जरूर द्या.
 संकट काळात अफवांचे पेव फुटते हे तर सर्वांनाच माहित आहे आपण मात्र त्या अफवा पसरवण्याचे माध्यम बनत नाहीत ना याची सर्वांनी काळजी घ्यावी. दररोज व्हॉट्सऍप वर हळद  पासून अावळ्या पर्यंत ते कसे उकळून /गाळून/ रस करून इत्यादी. पिल्याने करोना कसा कायमचा नष्ट होतो याचे मेसेज फिरत असतात. शास्त्रज्ञ जे दीड वर्ष रात्रंदिवस मेहनत घेऊन लस, रेमडेसविर असे उपयोगी उपाय बनविण्यात दंग आहेत त्यांना अजून तरी अशा व्हॉट्सऍप वर फिरणाऱ्या घरगुती उपायांचे सुस्पष्ट असे प्रमाण मिळालेले नाहीत. तरी असे प्रमाण मिळेपर्यंत आपण असले मेसेज कृपया पुढे पाठवू नका.
या काळात आपण आपल्या शेजाऱ्यांची पण काळजी घ्या कारण कधी आपल्याला शेजाऱ्यांची गरज लागू शकते हे सांगता येत नाही.
करोना चे पहिले महायुद्ध आपण अटीतटीने लढलो व आता हे दुसरे महायुद्ध पण आपण एकमेकांच्या सहकार्याने व ईश्वरकृपेने नक्कीच जिंकू!!
 डॉ. मंगेश गायकवाड
हृदयरोगतज्ञ
के. इ. एम हॉस्पिटल, मुंबई.

Advertisement

Advertisement