बीड : देशात कोरोनाची जेव्हा नव्याने ओळख झाली, त्यावेळेची भीती वेगळी होती, पहिल्या लाटेत रुग्णांना वेगळे ठेवले जात होते , दवाखाने फारसे नव्हते, त्यावेळी महाराष्ट्रात कोरोनासाठी साध्या वॉर्डात ४ हजार रुपयांपर्यंतचे बिल आकारता येईल अशी सवलत सरकारनेच दिली होती, मात्र आता परिस्थिती बदलली आहे , दवाखाने खच्चून भरलेत, जागा मिळेल तिथे रुग्ण ठेवताहेत, वेगळा स्टाफ राहिलेलेच नाही, पीपीई किट देखील फार कोणी वापरात नाही, म्हणजे एका अर्थाने कोरोना वैद्यकीय दृष्ट्या साधा होत असताना अजूनही उपचाराचे दर मात्र चढेच आहेत, त्यामुळे आता तरी खाजगी रुग्णालयांनी उपचाराचे दर कमी करावेत अशी मागणी सामान्य लोक करीत आहेत. सरकारने देखील यात लक्ष घालण्याची गरज आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्यानंतर मागील वर्षी या रोगाबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील एक प्रकारची भीती, रुग्णाला संपूर्ण वेगळे ठेवावे लागते, उपचारासाठी जाणाऱ्या प्रत्येकानेच पीपीई किट घालावी लागते, सारा स्टाफच वेगळा ठेवावा लागतो, त्यासाठी स्टाफ मिळत नाही असे अनेक प्रकार होते.पीपीई किट लवकर मिळत नव्हत्या , त्यामुळे या रोगाचा उपचार प्रचंड महागला होता. सुरुवातीच्या काही दिवसात तर खाजगी रुग्णालयांमध्ये लाखोंची बिले केवळ रुग्णालयाचीच आकारली गेली. त्यावेळी राज्य सरकारने हस्तक्षेप करून रुग्णालयाच्या दरांवर किमान काही प्रमाणात नियंत्रण ठेवले होत्व. तरीही बीड सारख्या शहरात रुग्णालयाला सध्या खाटेचे प्रतिदिन ४ हजार रुपये आजही आकारता येतात.
मात्र वर्षभरात परिस्थिती बदलली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढली आहे. पूर्वी वेगळे कक्ष असल्याचे, आता काही ठिकाणी तर अगदी पार्किंगच्या जागेला देखील कक्ष बनवले जात आहेत. खाजगी रुग्णालयात पीपीई किटचे सोंग नसल्यातच जमा आहे. ५०-६० रुग्ण असतील तरी एकाच किट वर काम भागते अशी परिस्थिती आहे, सुविधांच्या किमती कमी झाल्या आहेत. आता स्टाफला क्वारंटाईन देखील करावे लागत नाही, त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाचा खर्च अर्थातच बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र कोरोनावरील उपचाराचे दर अजूनही कमी झालेले नाहीत , त्यामुळे आता तरी या रोगावरील उपचाराचे दर कमी करावेत अशी मागणी सामान्यांमधून होत आहे. एकतर वैद्यकीय क्षेत्रानेच याचा विचार करावा किंवा त्या क्षेत्रातील लोक याचा विचार करणार नसतील तर सरकारने विचार करावा असे लोक बोलत आहेत.
दर परवडत नसल्याचे सांगत योजनेकडे पाठ
इतरवेळी आपल्या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना मिळावी यासाठी रुग्णालयाने आटापिटा करतात, आपल्याकडे या योजनेतून उपचार होत असल्याची जाहिरात करतात , मात्र कोरोनाच्या बाबतीत या योजनेचे पॅकेज परवडत नसल्याचे सांगत अनेक रुग्णालयाने याकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे.