Advertisement

शेत मजुरांचे 'कौशल्य' वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रशिक्षण

प्रजापत्र | Saturday, 01/08/2020
बातमी शेअर करा

 जिल्ह्यातील साडेचारशे शेतकरी घेणार लाभ

बीड-सध्याच्या पीक पद्धतीमध्ये शेतीची कामे ही कौशल्यावर आधारित आहेत.कौशल्य नसेल तर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते.त्यामुळे बीड जिल्ह्यातील साडेचारशे शेत मजूरांना पहिल्या टप्प्यामध्ये फवारणी कशी करायची?,विषबाधा झाली तर काय काळजी घ्यायची?  यासंदर्भात कृषी विभागाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार असून हे प्रशिक्षण ५ ऑगस्टपासून सुरु होत आहे.कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून शेतमजुरांसाठी महत्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर सुरु करण्यात आला आहे.


                           शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. सध्याच्या पीक पद्धतीमध्ये किटनाशक फवारणी,फळबागांची छाटणी,बीबीएफद्वारे पेरणी,कापूस वेचणी, सूक्ष्म सिंचनाची देखभाल दुरुस्ती,रोपवाटिकेतील कामे,नियंत्रित शेती,शेतमालाची स्वच्छता ही सर्व कामे कौशल्यावर आधारित आहेत.शेत मजुरांना या कामांचे प्रशिक्षण दिल्यास निश्चितच कामांची गुणवत्ता,दर्जा व वेग सुधारण्यास मदत होणार असल्याने राज्यभरात कौशल्य आधारित प्रशिक्षण कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे.राज्यातील एक लाख शेत मजूर या प्रशिक्षणाचा लाभ घेणार असून जिल्ह्यातील ४४० शेत मजूर या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.यात त्यांना किटनाशकांची सुरक्षित फवारणी,हाताळणी व वापर यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून फवारणी वेळी चुकून विषबाधा झालीच तर काय काळजी घ्यायची याचे देखील प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.दरम्यान प्रशिक्षणावेळी शेत मजुरांना एक संरक्षण किट देण्यात येणार असून यात एक गॉगल,ग्लोज,संरक्षण पोषक आदी साहित्य असणार आहे.ती किट त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने वापरण्यासाठी भेट म्हणून देण्यात येईल.  

 

११ तालुक्यात होणार प्रशिक्षण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ११ तालुक्यातून प्रत्येकी ४० शेत मजुरांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून दोन दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे प्रशिक्षण दि.५ ते १० ऑगस्टच्या दरम्यान पार पडेल.


दत्तात्रय मुळे    (प्रकल्प संचालक,आत्मा)

 

 

कुठे असेल प्रशिक्षण

अ.क्र.  दिनांक   तालुका     स्थळ
1) ५ व ६ ऑगस्ट  बीड  के.एस.के.कृषी महाविद्यालय
2) ५ व ६ ऑगस्ट आष्टी  ता.कृ.आष्टी.सीड फार्म जळगाव  
3) ५ व ६ ऑगस्ट शिरूर   टाकळवाडी
4) ५ व ६ ऑगस्ट गेवराई रेवकी
5) ५ व ६ ऑगस्ट अंबाजोगाई सोनवाळा
6) ५ व ६ ऑगस्ट केज पळस खेडा
7)  ६ व ७ ऑगस्ट माजलगाव राधाकृष्ण शे.उ.कं. हारकिनिमगाव 
8)  ६ व ७ ऑगस्ट वडवणी  चिंचाळ
9) ७ व ८ ऑगस्ट पाटोदा  सोनेगाव
10) ८ व ९ ऑगस्ट धारूर   तेलगाव
11) ९ व १० ऑगस्ट परळी   भिलेगाव

 

Advertisement

Advertisement