Advertisement

रुग्णसंख्येच्या वाढीमध्ये देशात तीन राज्ये  आघाडीवर 

प्रजापत्र | Monday, 12/04/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१२ - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये दिवसाला आढळणाऱ्या बधितांचा आकडा  रोज नवा विक्रम करत असून रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र, छत्तीसगड व पंजाब आघाडीवर आहेत. या तीन राज्यातील ५० जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी आता येथील वाढत्या रुग्णसंख्येमागील कारणे सांगितले आहेत.

 

यातील तीन राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये आरटी- पीसीआर चाचण्यांची कमतरता,विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा अभाव व आरोग्यकर्मीचा  तुटवडा  ही रुग्णवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे केंद्रीय पथकांचे म्हणणे आहे.

 

महाराष्ट्रातील सातारा,सांगली व औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये परिस्थिती नियंत्रण आणि सक्रीय देखरेखीचा अभाव असल्याचे केंद्रीय पथकाने जारी केलेल्या व्यक्तव्यामध्ये म्हटले आहे. याखेरीज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोव्हीड चाचणी यंत्रणांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण आल्याने चाचण्यांचा निकाल देण्यासाठी विलंब होत असून कोरोना संबंधितांच्या उपायांचे पालन करण्यात येत नसल्याचे केंद्रीय पथकांनी निदर्शनात आणून दिले आहे.

 

दरम्यान देशातील एकूण सक्रिय बधितांपैकी ४८.५७ टक्के बाधित असलेल्या महाराष्ट्रात केंद्रीय पथकांची ३० जिल्ह्यांना भेटी दिल्या यानंतर ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.
 

Advertisement

Advertisement