Advertisement

बीडच्या तलाठी भरतीचे काय होणार ?

प्रजापत्र | Friday, 31/07/2020
बातमी शेअर करा

तलाठी पदासाठी निवड झालेल्यांना प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका : नियुक्त्या देण्यास शासनाची स्थगिती 
बीड : मागील वर्षी तलाठी पदासाठी परीक्षा झाला, त्याचा निकालही लागला मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ज्यांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत अशा उमेदवारांना आता प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे. ज्यांना अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत, त्यांना सध्या नियुक्त्या देऊ नयेत असे आदेश आता राज्यसरकारने दिले आहेत. बीड सह औरंगाबाद , नांदेड आदी जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. 
बीड जिल्ह्यात तलाठी पदाच्या ६४ जागांसाठी मागील वर्षी म्हणजे जुलै ऑगस्ट २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेचा निकालही २०१९ च्या सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे अपेक्षित होते. मात्र बीड जिल्ह्यासह औरंगाबाद, नांदेड आणि इतर काही ठिकाणी प्रशासनाने कागदपत्र पडताळणी , त्यासाठी निवड यादीतील अनुपस्थित व्यक्तींना अनेकदा संधी देणे यात वेळ घालवला, निकाल लागून १० महिने झाल्यानंतरही बीड, औरंगाबाद , नांदेड या जिल्ह्यात नियुक्ती आदेश दिले गेले नाहीत . 
आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या भरती बंदीचा फटका या व्यक्तींनाही बसला आहे. ज्या ठिकाणी निवड यादी तयार आहे, मात्र नियुक्त्या दिलेल्या नाहीत अशा ठिकाणी नियुक्त्या देऊ नयेत असे आदेश आता शासनाने दिले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील ६४ व्यक्तींची सरकारी नोकरीची संधी हुकली आहे. 

--- 
निवड यादी  वर्षभर चालणार पण 
सरकारने सध्याची निवड यादी वर्षभर चालणार असल्याचे जाहीर केले आहे, मात्र निवड यादी जाहीर करूनही ८ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. आणखी एक वर्ष आहे असे गृहीत धरले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता भरती कधी होणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे या सवलतीचा कितपत फायदा होईल यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. 

----

Advertisement

Advertisement