Advertisement

 कोरोनासाठी उपलब्ध होणार ८०० पेक्षा जास्त खाटा 

प्रजापत्र | Monday, 12/04/2021
बातमी शेअर करा

बीड दि.११ (प्रतिनिधी)-राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता अनेक ठिकाणी खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संबंधित रुग्णालयांमधील ८० % खाटा केवळ कोरोनासाठीच राखून ठेवाव्यात असे निर्देश या योजनेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पाडियार यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. बीड जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३४ रुग्णालये असून यातील ६ सरकारी तर २८ खाजगी आहेत. त्यामुळे यातून जिल्ह्याला कोरोनासाठी सुमारे ८०० खाटा नव्याने उपलब्ध होणार आहेत.

 

               राज्यातच कोरोना रुगणांसाठी खाटा कमी पडू लागल्या आहेत.त्यामुळे शक्य त्या ठिकाणाहून खाटा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीड शहरातील ८ रुग्णालयांमधील १० % खाटा केवळ कोरोनासाठीच राखून ठेवण्याचे आदेश दिले होते.आता मात्र राज्यस्तरावरच महात्मा फुले जण आरोग्य योजनेशी संबंधित रुग्णालयांमध्ये ८० % खाटा केवळ कोरोनासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसे निर्देश आरोग्य हमी सोसायटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या रुग्णालयांमधील ८० % खाटा राखून ठेवून त्यातून रुग्णांवर योजनेअंतर्गत उपचार करावे लागणार आहेत. त्यामुळे साहजिकच रुग्णांवरील आर्थिक ताण देखील कमी होणार आहे.

 

बीड जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे ३४ रुग्णालये आहेत. यात बीडचे जिल्हा रुग्णालय , स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकी महाविद्यालय आणि काही उपजिल्हा रुग्णालये सोडली तर सुमारे २८ खाजगी रुग्णालयाने आहेत. ज्यांची क्षमता ४० ते ६० खाटांच्या दरम्यान आहे. आता या सर्व रुग्णालयांमधील ८० % खाटा उपलब्ध झाल्या तर हा आकडा सहज ८०० च्या पुढे जाणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सध्या तरी रुग्णांना खाटांसाठी वणवण करावी लागणार नाही

Advertisement

Advertisement