डॉक्टरांना भरावी लागणार ढीगभर माहिती
बीड-कोरोनाला तब्बल एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी झाल्यानंतरही रेमडीसिवीरसारख्या इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करण्यात सरकारला अपयश आले आहे. आता राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून लोक रेमडीसिवीरसाठी ठिकठिकाणी रांगा लावत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रेमडीसिवीरचा मुबलक पुरवठा करण्याऐवजी राज्य सरकारने इंजेक्शन रेमडीसिवीरच्या वापरावरच मोठ्या प्रमाणावर बंधने घातली आहेत. आता एखाद्या रुग्णाला हे इंजेक्शन देण्यापूर्वी डॉक्टरांना ढीगभर माहिती भरावी लागणार असून त्यानंतरच इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे उपचाराच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होण्यासारखे चित्र आहे.
कोरोनाच्या उपचारात सध्या इंजेक्शन रेमडीसिवीर महत्वाची भूमिका बजावत आहे. हे इंजेक्शन रुग्णाला बरे करण्यात प्रभावी ठरत असल्याचे समोर आल्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मात्र आता राज्यभर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. गावागावातून या इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनसाठी लोक रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे. मात्र या इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करण्यात सरकारला अपयश आले आहे.
आता हे अपयश झाकण्यासाठी सरकारने डॉक्टरांना हे इंजेक्शन लिहून देण्यासाठीच मोठ्या प्रमाणावर बंधने घातली आहेत. कोणत्याही परिस्थितीत अत्यंत आवश्यकता वाटल्यासच आणि सुरुवातीच्या काही दिवसातच हे इंजकेशन द्यायचे आहे असे बंधन आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी घातले आहे. त्यानुसार हे इंजेक्शन लिहून देण्यापूर्वी डॉक्टरांना रुग्णाची इत्यंभूत माहिती आणि रेमडीसिवीरची गरज का आहे हे प्रिस्क्रिप्शनवर लिहून द्यावे लागणार आहे.
भरावी लागणार ही माहिती
रेमडीसिवीर इंजेक्शन देण्यासाठी रुग्णाची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. यात रुग्ण कधी दाखल झाला, त्यावेळी त्याची ताप,श्वसन दर, नाडीचे ठोके, ऑक्सिजनचे प्रमाण किती होते? आता किती आहे? त्याचा एचआरसीटी स्कोर किती आहे, त्याला इतर कोणते आजार आहेत, रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहे का? असल्यास कधीपासून हे सारे भरावे लागणार असून त्यानंतर रेमडीसिवीरची गरज का आहे हे देखील लिहुन द्यावे लागणार आहे.
म्हणे रेमडीसिवीर मृत्यु रोखत नाही
रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता आरोग्य विभागाने रेमडीसिवीरची मागणी कमी व्हावी म्हणून हे इंजेक्शन फक्त रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यासाठी आहे, याचा कोरोना मृत्यू रोखण्यासही संबंध नाही. तसेच सुरुवातीच्या काही दिवसात दिल्यासच या इंजेक्शनचा उपयोग होतो याची जाणीव डॉक्टरांना आणि रुग्णांना करून देण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या सचिवांनी दिले आहेत.