Advertisement

आणीबाणी सैनिकांच्या बाबतीत सरकारने काय घेतला आहे निर्णय

प्रजापत्र | Friday, 31/07/2020
बातमी शेअर करा

आणीबाणी सैनिकांना मानधनाची योजना बंद 
बीड : आणिबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींना मानधन देण्याची फडणवीस सरकारची योजना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचे कारण दाखवत ठाकरे सरकारने बंद केली आहे. 
फडणवीस सरकारने २०१८ मध्ये राज्यात आणीबाणीच्या काळात ज्यांनी कारावास भोगला त्यांना मानधन देण्याची योजना सुरु केली होती. आणीबाणी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे सांगत आणीबाणीत ज्यांनी बंदिवास भोगला त्यांना लोशाहीसाठी लढणाऱ्या व्यक्ती म्हणून गौरविण्याचा निर्णय घेतला होता , तसेच त्यांना मानधन देखील सुरु केले होते. त्यावेळी सरकारच्या या निर्णयाबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटातूनगोटातून विरोध झाला होता. संघ परिवाराचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही त्यामुळे त्या संघटनेच्या लोकांना गौरविण्यासाठी ही  योजना आल्याचेही बोलले गेले होते. 
आता ठाकरे सरकारने कोरोनामुळे राज्यासमोरील आर्थिक संकटाचे कारण दाखवत ही  योजनाच गुंडाळली आहे. यापुढे राज्यात या योजनेची अंमलबजावणी बंद करण्यात आल्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. 
बीड जिल्ह्यात या योजनेतून ६३ व्यक्तींना मानधन सुरु करण्यात आले होते. तर राज्यात ही संख्या ३ हजार ४५२  इतकी होती. 

चुकीचा निर्णय 
आणीबाणीला केलेला विरोध हा लोकशाही बळकटीसाठी होता. आम्ही स्वार्थासाठी नव्हे तर राष्ट्रीयत्वासाठी काम केले होते . अगदी घरावर तुळशीपत्र ठेवून कम्म केले होते. खरेतर मानधन आणखी वाढीविण्याची गरज होती. मात्र सरकारने ही योजनाच बंद केली हे योग्य नाही. आमच्यातील अनेकजण आता सत्तरीच्या पुढे आहेत. अशावेळी असे करणे चुकीचे आहे. 
विजयकुमार पालसिंगणकर 
मराठवाडा अध्यक्ष, लोकतंत्र  सेनानी संघ 

बंदच करायला हवी होती 
ही  योजनाच मुळात संघाच्या लोकांना गौरवण्यासाठी सुरु करण्यात आली होती, या योजनेच्या समितीवर तेच लोक आहेत, त्याच लोकांना मानधन मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे ही योजना बंदच करायला हवी होती . सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. 
उषा दराडे , 
माजी आमदार तथा आणीबाणी सैनिक 

 

Advertisement

Advertisement