आष्टी ( प्रतिनिधी)
आष्टी शहरातील सुखकर्ता अर्बन निधीचे चेअरमन बाळासाहेब शिरसाठ (वय ४३) यांचा मृतदेह शहराजवळील धनवडेवस्तीनजीक विहिरीत संशयास्पद अवस्थेत सापडला असल्याने त्यांचा घातपात आहे की आत्महत्या? गूढ वाढले आहे. घटनास्थळी आष्टी पोलीसांनी धाव घेत मृतदेह क्रेन च्या साह्याने बाहेर काढला असून आष्टी पोलीस तपास करत आहेत.या घटनेने आष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील अरणविहिरा हे बाळासाहेब शिरसाठ यांचे मुळगाव.ते गेली अनेक वर्षांपासून तीन भाऊ व त्यांचा परिवार
आष्टी शहरात वास्तव्यास आहेत. मागील तीन ते चार वर्षांपूर्वी सुखकर्ता अर्बन निधी नावाची पतसंस्था शिरसाठ यांनी सुरू केली होती.आष्टी येथील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर त्यांनी दुसरी शाखा अहमदनगर,तर आष्टी शहरात दोन ठिकाणी एटीएम सुविधा,अंमळनेर येथे एटीएम सुविधा ते चालवत होते. थोड्याच दिवसांत त्यांनी या सर्व व्यवसायात भरारी घेऊन नावारुपाला आणले होते.
मात्र,दोन दिवसापासून गुरुवारच्या रात्री १० वाजल्यापासून ते बेपत्ता होते. शनिवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आष्टी शहराजवळील धनवडेवस्तीनजीक चव्हाण यांच्या शेतामधील विहीरीत बाळासाहेब शिरसाठ यांचा संशयास्पद मृतदेह सापडला आहे. परंतु,गळा कमरेचा पट्याने अवळलेल्या अवस्थेत होता तर विहिरीत गुडघ्याला लागेल इतके कमी पाणी होते आणि चेहऱ्यावर छोट्यामोठ्या जखमा होत्या.यायामुळे नक्की त्यांची हत्या झाली की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त केला जात असून हे पोलीस तपासात पुढे येईल.नातेवाईकांच्या मागणीनंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची कसून चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकाकडून होत आहे.या घटनेचा पुढील तपास पो.नि. सलीम चाऊस,स.पो.नि. भारत मोरे,पो.कॉ. सचिन कोळेकर,पो. कॉ.शिराज पठाण हे करत आहेत.
त्यांच्या पाठीमागे पत्नी,दोन मुली,आई,वडील,तीन भाऊ,भावजाई असा मोठा परिवार आहे.बाळासाहेब शिरसाठ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आष्टीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.