बीड : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका बनावट दारुच्या कारखान्यावर छापा मारला. या ठिकाणाहून तब्बल 2600 लिटर स्पीरीट आणि इतर यंत्र सामुग्री जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागापूर जवळील एका इमारतीत सुरु असलेल्या बनावट दारुच्या कारखान्यावर छापा मारला. त्या ठिकाणी बनावट दारुची वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये बॉटलिंग होत होती. पथकाला त्या ठिकाणी वेगवेगळे लेबलही मिळाले आहेत. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट दारु निर्मिती सुरु असेल याची पथकालाही कल्पना नव्हती त्यामुळे रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. घटनास्थळावरील साहित्याचे प्रमाण कळल्यानंतर स्वत: अधिक्षक नितिन धार्मिक घटनास्थळी गेले. या ठिकाणाहून पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले आहे तर 2600 लिटर स्पीरीट, बॉटलिंगची मशिन, वेगवेगळ्या कंपन्यांचे लेबल आणि इतरही साहित्य जप्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी बीडच्या औद्योगीक वसाहतीत पाणी शितकरणाच्या आड बनावट दारु तयार होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीसांनी एक छापा मारला होता मात्र त्यावेळी त्या ठिकाणी काहीच आढळून आले नव्हते. हा छापा संशयाच्या भोवर्यात आडकला होता. आज नागापूर जवळ मारलेल्या छाप्यात बीडच्याच त्या छाप्याशी संबंधीत काही व्यक्तींचा संबंध असल्याची माहिती हाती येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
बातमी शेअर करा