Advertisement

निव्वळ काठीवर चालणारी पोलीसींग बदलावी लागेल

प्रजापत्र | Wednesday, 29/07/2020
बातमी शेअर करा

मागच्या काही वर्षात समाजात काही प्रमाणात बदल होत आहेत. स्वत:ला सिंघम समजण्याचं युग आता राहिलेलं नाही. निव्वळ काठीवर किंवा मारहाण करून नियंत्रण ठेवता येईल हा सर्वसाधारण दृष्टिकोन आता चालणार नाही केवळ पोलीसांनाच नव्हे तर प्रशासनाच्या सर्वच भागांना आता ब्रेन ओरियेंटेड व्हावं लागेल या शब्दात बीडचे पोलीस अधीक्षक  हर्ष पोद्दार यांनी भावना व्यक्त केल्या.

या मुलाखतीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 
https://youtu.be/1Eq9X7PleY4

प्रश्‍न-कॉर्पोरेट लॉयर म्हणून विदेशात चांगल्या करिअरची संधी असताना आपण सिव्हील सर्व्हिसेसकडे का वळलात?
हर्ष पोद्दार-
मला सुरूवातीपासून वादविवादाची आवड होती. वादविवाद स्पर्धेत भाग घेताना राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा व्हायच्या. त्यातूनच सार्वजनिक जिवनाबद्दल एक आकर्षण निर्माण झालं. शिक्षणासाठी कायद्याची निवड करण्यामागे सुध्दा तेच आकर्षण होतं. कायद्याच्या क्षेत्रातून आपण अनेकांपर्यंत पोहचू शकतो, अनेकांना मदत करू शकतो हा हेतू होता. मागच्या तीन दशकात विधी पदवीधारांना अनेक संधी वाढल्या आहेत.
प्रश्‍न-विधी पदवीधर किंवा वकीलांनी आजच नव्हे तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजाला एक दिशा आणि नेतृत्व दिलेले आहेच?
हर्ष पोद्दार-होय. अगदी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास वाचनाताच ते योगदान लक्षात येत होतं. म्हणूनचही मी कायद्याच्या शिक्षणाकडे वळलो. त्यातच ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठात शिकायची संधी मिळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठाने जगाच्या वेगवेगळ्या भागाला अनेक नेते दिले आहेत. समाजसेवा आणि सार्वजनिक जीवन हे ऑक्सफर्डचं कल्चर आहे. समाजासाठी आपण काय देणार हा संस्कार या ठिकाणी मिळाला आणि मग पौंडस् आणि डॉलर या मध्ये माजी स्वत:ची आणि माझ्या फर्मची प्रगती होणार होती. पण मग समाजाचं काय. आपण समाजाला काय देणार? यासाठीच आपण शिकलो का? असा प्रश्‍न मनाला पडायचा आणि प्रत्येकवेळी त्याचं उत्तर नकारार्थी असायचं. त्यामुळेच कामाचं समाधान मिळत नव्हतं. त्यातूनच मग सिव्हील सर्व्हिसेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
प्रश्‍न-सिव्हील सर्व्हिसेसमध्ये येताना अनेकांना आयएएस व्हायचं असतं? आपलं स्वप्न काय होतं?
हर्ष पोद्दार-
मी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास केला असल्याने मला विदेष सेवेचं आकर्षण होतं. सुरूवातीला माझी निवड रेव्हेन्यू सर्व्हिसेससाठी झाली. त्या ठिकाणी एक फाऊंडेशन कोर्स असतो. त्या कोर्समध्ये तुमची प्रशासनासोबत खर्‍या अर्थाने ओळख होते. गावागावात भेटी दिल्या जातात. त्या भेटीतून आपण गावच्या समाजजीवनावर कोणत्या माध्यमातून, कोणत्या पातळीवरून परिणाम घडवू शकतो हे लक्षात आलं आणि मग त्याचवेळी आपल्या मातीसाठी, ग्रामीण भागासाठी काय करता येईल याचा विचार करू लागलो. त्यातूनच मग विदेश सेवेपेक्षा आयपीएस बरं वाटलं आणि मी या क्षेत्रात आलो.
प्रश्‍न-पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्राने अनेक दशकांपासून देशाला नेतृत्व देण्याचे काम केले आहे. हा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. मग पश्‍चिम बंगालमधला एक व्यक्ती महाराष्ट्र केडर निवडतो यामागचं कारण काय होतं?
हर्ष पोद्दार-
मी जेव्हा आयपीएस झालो त्यावेळी मला नोकरी करताना कुटुंब, जात, समाज याची ओळख चिकटावी असं वाटत नव्हतं. त्यामुळेच मग होमस्टेट निवडायचं नाही. अशावेळी कोणत्या राज्याला प्राधान्य द्यायचं हे समोर आल्यानंतर साहजिकच उत्तर महाराष्ट्र हे होतं. महाराष्ट्रात जी प्रशासकीय रचना आहे. एक भक्कम आणि दणकट प्रशासकीय चौकट आहे ती इतर ठिकाणी तितकीशी नाही. पोलीसांच्या बाबतीत म्हणाल तर महाराष्ट्र पोलीसांचं नाव आज देशात फार आदरानं घेतलं जातं. त्यातही महाराष्ट्रात पोलीसींगचे वेगवेगळे प्रकार आहेत. गडचिरोली मध्ये नक्षलवादासोबत लढावं लागतं. मालेगावसारख्या भागात सांप्रदायिकतेसोबत लढावं लागतं. मुंबई पुण्यात अर्बन पोलीसींग तर बीडसारख्या जिल्ह्यात रूलर पोलीसींग करावी लागते इतकी विविधता आहे. त्यासोबतच पश्‍चिम बंगालमधून आलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रात सहज मिसळता येतं कारण या दोन्ही राज्यांचे मुळ संस्कार एक आहेत. चिकित्सक वृत्ती, अभ्यास, संगीत, सामाजिक सुधारणा, समाजाचा विचार, कुटुंबव्यवस्था, कौटुंबिक मूल्य या सार्‍या गोष्टी महाराष्ट्रात आणि पश्‍चिम बंगालमध्ये सारख्याच पहायला मिळतात.
प्रश्‍न-आपली कौटुंबिक पार्श्‍वभूमी काय?
हर्ष पोद्दार-
माझं कुटुंब दोन पिढ्यांपूर्वी कोलकत्त्याला आलं. त्यामागे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही आईवडीलांची इच्छा होती. केवळ अभ्यासक्रमातलं शिक्षण नाही तर त्यासोबतच खेळ आणि इतर सर्व गोष्टींमध्ये आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही पालकांची इच्छा होती. त्यातूनच मग लमाटेनीया सारख्या प्रख्यात शाळेत आम्ही शिकलो. घर मध्यमवर्गीय त्यामुळं कुठला वारसा नाही त्यातूनच मग जे काही करायचं आहे ते स्वत:च्या जीवावर करायचं आहे हा संस्कार आमच्यावर झाला.
प्रश्‍न-आपल्यावर प्रभाव कोणाचा?
हर्ष पोद्दार-
प्रभावाचं म्हणत तर ईश्‍वराचा आशिर्वाद आणि आईचा जास्त प्रभाव आहे. माझ्यासाठी आईनं खूप मोठी स्वप्न पाहिली. त्यांना स्वत:चं करिअर सोडावं लागलं. त्यामुळे माझ्यावर आईवडीलांचा प्रभाव आहे.
प्रश्‍न-ही जी सिव्हील सर्व्हिसची परिक्षा असते ती किती सोपी असते आणि किती अवघड असते?
हर्ष पोद्दार-
या ज्या परिक्षा असतात त्यासाठी वर्षात दहा लाख लोक परिक्षेला बसतात. त्यातले बारा हजार मुुख्य परिक्षा उत्तीर्ण होतात. त्यातल्या एका हजार जणांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. आणि सहाशे सातशे व्यक्तींची निवड होते. त्यातले शंभर दोनशे आयएएस आयपीएस होतात. म्हणजे हे प्रमाण दहा हजारांमागे एक असं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतातच पण त्यासोबतच नशिब हे देखील महत्वाचं असतं. या परिक्षा देताना एक निश्‍चित धोरण असलं पाहिजे. पाच-सहा वेळा परिक्षा देत बसू नका. एक-दोन वेळाच प्रयत्न करा. या परिक्षा देत असताना करिअरसाठी एखादं बॅकअप ठेवा. सिव्हिलसर्व्हिसेस म्हणजे यश आहे असंही समजण्याचं कारण नाही. समाजसेवा तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून करू शकता.
प्रश्‍न-आयपीएस झाल्यानंतर आपण मालेगावमध्ये एक प्रकल्प राबविला ज्यातून आपली वेगळी ओळख झाली.काय होता तो प्रकल्प?
हर्ष पोद्दार-
मालेगावसारखा प्रकल्प बीड जिल्ह्यातही राबवायचा होता. पण अगोदर निवडणूका नंतर सीएएचं आंदोलन आणि त्यानंतर कोरोना यामुळे ते राहून गेलं. मालेगावबद्दल बोलायचं तर या शहराला सांप्रदायिक दंगलीचा इतिहास आहे. हे दंगे भडकवलेलेच होते. हे खरे असले तरी त्यात युवकांचा जास्त सहभाग असतो हे पाहून धक्का बसला. हा सहभाग जास्त का असावा यावर विचार करताना एक लक्षात आलं की सातत्यानं होणार्‍या दंगली, बाँबस्फोट, सांप्रदायिक वातावरण यामुळं इथल्या तरूणाईमध्ये एक नकारात्मकता भरलेली आहे. यांच्यासमोर कुठली स्वप्नचं नाहीत. मग या तरूणाईला आपण विकासाची स्वप्न दाखविली पाहिजेत. यासाठी करिअर मार्गदर्शन, वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीबद्दल माहिती देणं सुरू केलं, तरूणाईला बोलतं केलं आणि त्याचे परिणाम जाणवायला लागले. भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. पण मालेगाव शांत राहिले. इथं विरोध झाला नाही असं नाही पण हिंसक विरोध झाला नाही. कारण तिथल्या तरूणाईसोबत पोलीस यंत्रणेनं एक नातं निर्माण केलं होतं.
प्रश्‍न-हर्ष पोद्दार हा पोलीस खात्याचा लाडका चेहरा आहे हे कसं जमलं?
हर्ष पोद्दार-
सध्याचं युग हे कोणीही स्वत:ला सिंघम समजण्याचं युग नाही. निव्वळ काठीवर, काठी चालवून, मारहाण करून पोलीसींग करता येईल हा साधारण दृष्टिकोन आता चालणार नाही. गुन्ह्याचं स्वरूप बदलतंय, गुन्हेगार बदलतायत, सायबर, आर्थिक गुन्हे वाढतायत अशावेळी वेगळा विचार करावा लागेल हे सातत्यानं मांडावं लागतं. केवळ पोलीसांनाच नव्हे तर प्रशासनाच्या सर्वच विभागांना ब्रेन आणि माईंड ओरिएंटेड व्हावं लागेल हे मी सांगतो. त्यातून कदाचित अशी प्रतिमा निर्माण झाली असेल.
प्रश्‍न-पोलीसांच्या विवेकाधिकाराबाबत सिबीआयसारख्या मासिकातून आपण देशाला कायद्यातील तरतूदी सांगितल्या. पण आपल्या जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने प्रतिबंधात्मक कारवाया होतात?
हर्ष पोद्दार-
बीड जिल्हा हा काही साधारण जिल्हा नाही. अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. याठिकाणी कारवायांचे आकडे मोठे आहेत पण या कारवाया विचार न होता झालेल्या नाहीत. व्यक्तीच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कारवाई व्हावी असा आमचा प्रयत्न असतो. निवडून कारवाया झाल्या आहेत.
प्रश्‍न-निवडून कारवया म्हणता मग अगदी पती-पत्नीच्या किंवा दोन व्यक्तींचा भांडणातही प्रतिबंधात्मक कारवाया होतात?
हर्ष पोद्दार-
व्यक्तीगत वादात खरंतर प्रतिबंधात्मक कारवाया होत नाहीत. पण कधीकधी त्या व्यक्तीवर इतरही अनेक गुन्हे असतात अशावेळी त्या व्यक्तीवर कारवाई करावी लागते.  जमिनीच्या वादातून जे गुन्हे घडतात त्या प्रकरणात वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई केल्यामुळे यावर्षी अशा भांडणाचं प्रमाण कमी झालं आहे. प्रतिबंध आणि योग्यवेळी हस्तक्षेप या पोलीसींगसाठी महत्वाचा बाबी आहेत.
प्रश्‍न-हर्ष पोद्दार व्यक्ती म्हणून लाचखोरीच्या बाबतीत कठोर भूमिका घेतात पण तरीही अशा घटना थांबायला तयार नाहीत?
हर्ष पोद्दार-
लाचखोरीच्या बाबतीत मी माझी भूमिका अनेकदा स्पष्ट केली आहे. पण वेगवेगळी प्रकरणं समोर येतात हे चांगलंच आहे. प्रशासनाने हे लपविलं नाही पाहिजे. आम्ही ज्या पध्दतीनं चुकीच्या व्यक्तींवर कारवाया केल्या त्याच पध्दतीनं ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना बक्षीसंही दिली. मुळात ज्या लोकांना लहानपणापासून चोरी करून पुढं जायला आवडतं ते लाचखोरीसारख्या गोष्टी करतात. अशावेळी कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. अशा लोकांना बाहेर फेकावंच लागतं.
प्रश्‍न-आपल्याकडे ‘ताली बॉसको, तो गाली भी बॉसको’ असं म्हटलं जातं. मग या लाचखोरीच्या घटना समोर येतात. त्यात आपली जबाबदारी नाही का?
हर्ष पोद्दार-
जबाबदारी आहेच. लाचखोरीच्या इतक्या घटना समोर येतात ही शरमेचीच बाब आहे. अशी एखादी घटना समोर आल्यानंतर कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझी मान शरमेने खाली झुकते पण हे जसं खरं आहे तसं विभागात हजारो गोष्टी चांगल्या घडतात. भर पावसात बडदापुरसारख्या चेकपोटस्टवर एक पोलीस कर्तव्य बजावत असतो, कंटनमेंट झोनमध्ये काम केल्यामुळे कोरोनाची बाधा झालेला पोलीस कर्मचारी कोरोनाशी झगडत असतानाही ड्यूटीचं समाधान त्याच्या चेहर्‍यावर असतं. अशा अनेक घटना आहे. एक दिवा विझला तर असे पाचशे दिवे नव्यानं पेटतात याचा आनंद होतो.
प्रश्‍न-सेवेमध्ये अनेकदा मनाप्रमाणे निर्णय घेता येत नाहीत. त्यावेळी नेमकं काय वाटतं?टिकण्याची उर्जा कोठून घेता
हर्ष पोद्दार-
अर्थातच समाजसेवेतून. आपण या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आलोय हे लक्षात आलं आणि आपल्या कोणत्याही कृतीने लोकांना काय फायदा होणार आहे याचा विचार केला की आपोआप उर्जा मिळत राहते.
प्रश्‍न-सातत्याने आपल्या बदलीची अफवा येत असते?
हर्ष पोद्दार-
त्याची आता सवय झाली आहे. माझं मलाच आपण इथे राहिल्याचं आश्‍चर्य वाटतं. अर्थात नौकरीत कुठल्याही एका पदाला चिकटून राहायचं नसतं. आदेश आला की निघायची माझी तयारी आहे. सामान भरायला फक्त दोन दिवस लागतात. आणि मी इथं काही निवडणूक जिंकायला आलेलो नाही. स्वत:च्या इमेज मध्ये अडकायचं नाही. इगो मोठा होवू द्यायचा नाही. फक्त आपलं काम इमानदारीने करायचं. कार्यकाळ पूर्ण होताच निघून जायचं. आपण काही स्वत:चं नाव कमवायला म्हणून इथं आलेलो नाही ही माझी भूमिका असते.
प्रश्‍न-आपलं पुढचं ध्येय काय?
हर्ष पोद्दार-
या सेवेमध्ये रोज नवं नवं ध्येय समोर ठेवता येतं. कोणत्या पदावर जाण्याचं आपलं उद्दिष्ट नाही तर आपल्या पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना फायदा देता यावा हेच माझं ध्येय आहे.
प्रश्‍न-जगण्याकडं कसं पहावं याबद्दल आपण काय संदेश द्याल?
हर्ष पोद्दार-
जगण्याबद्दलचा संदेश देण्याएवढं माझं वय किंवा अनुभव नाही. पण दोन गोष्टी आहेत. आधुनिक काळात समाज प्रगती करतोय मात्र प्रगतीसोबतच स्वार्थ वाढत आहे. आपण इतरांचा विचार करायला तयार नाही. तरूणाईने स्वत:सोबतच समाजाचा आणि देशाचा विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वत:ला ओळखा. देशाला ओळखा. यासाठी देशासाठी आपण काय करू शकतो. आणि ज्याठिकाणी आहात त्या ठिकाणाहून काय करू शकतो याचा विचार करून समाजकार्य करत चला.

Advertisement

Advertisement