Advertisement

खळबळजनक ! जिल्हा रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह आरोपी फरार

प्रजापत्र | Wednesday, 29/07/2020
बातमी शेअर करा

बीड-येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोना पॉझिटिव्ह आरोपी रुग्णालयातून फरार झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी (दि.29) समोर आला आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी माहिती दिली.
एका आरोपीचा कोरोना अहवाल 22 जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.मंगळवारी सायंकाळपर्यंत तो आरोपी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता.त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने आणि कोरोनाची लक्षणे सौम्य झाल्याने त्याला आयटीआयमधील कोव्हीड सेंटरमध्ये रेफर करण्यात येणार होते.मात्र याच वेळी त्याने संधीचा फायदा घेत रुग्णालयातून पळ काढला.बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

 

सहा दिवस घेतले उपचार 
दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आरोपीने जिल्हा रुग्णालयात सहा दिवस उपचार घेतले.त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने आयटीआय कोव्हीड सेंटरमध्ये रेफर करण्यात येत होते.मात्र याच वेळी त्याने सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत पळ काढला.

 

तीन वार्ड एक स्टाफ नर्स हायरिस्क
कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला धूम ठोकण्याची  संधी मिळाली ती केवळ तीन वार्डला एक स्टाफ नर्स असल्याने.वार्ड क्रमांक पाच आणि सहा एकमेकांना संलग्न असून हे सर्वात मोठे वार्ड आहेत.इथे एकावेळी एक स्टाफ नर्स कार्यरत असल्याने रुग्णांकडे लक्ष देणे अवघड जाते, आणि यातून असे प्रकार मग घडतात.अगदी परिचारिका आणि मामा किंवा मावशी यांनी देखील तीन वार्डला एकाची ड्युटी लावण्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

जबाबदारी कोणाची? 
आरोपी फरार झाला असला तरी आता मुख्य प्रश्न म्हणजे ही जबाबदारी  नेमकी कोणाची आहे? कारण पॉझिटिव्ह व्यक्ती आरोपी असल्याने त्याच्या उपचारावेळी पोलिसांची त्या ठिकाणी नियुक्ती असणे गरजेचे असल्याची चर्चा सध्या रुग्णालयात सुरु आहे.

 

कोणीही या, कधीही जा... 
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असल्याने रुग्णालयाच्या दारात गार्डची नियुक्ती असणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधिताचा रुग्णालय परिसरातील मुक्तसंचाराचा प्रकार समोर आला होता. मात्र यातून रुग्णालय प्रशासनाने काहीही बोध घेतला नाही. परिणामी मंगळवारी सायंकाळी आरोपीने सहजरित्या रुग्णालयातून पळ काढला. इथे कोणीही या आणि कधीही जा अशी पद्धत सर्वांसाठीच घातक ठरणार आहे.

Advertisement

Advertisement